पालिका रुग्णालयात बेकायदेशीर कामकाज

By admin | Published: November 19, 2016 02:49 AM2016-11-19T02:49:01+5:302016-11-19T02:49:01+5:30

नियमांवर बोट ठेवून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नियमबाह्य कामकाज सुरू आहे.

Unlawful functioning at the municipality hospital | पालिका रुग्णालयात बेकायदेशीर कामकाज

पालिका रुग्णालयात बेकायदेशीर कामकाज

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नियमांवर बोट ठेवून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नियमबाह्य कामकाज सुरू आहे. ३०० बेडची परवानगी असताना प्रत्यक्षात जवळपास ४०० बेडचे रुग्णालय चालविले जात आहे. रुग्ण संख्येच्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर कर्मचारीवर्ग अपुरा आहे. अग्निशमन यंत्रणा बंद असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्रही रुग्णालयाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. महापालिकेचे तुर्भे व कोपरखैरणे माताबाल रुग्णालय बंद झाले आहे. नेरूळ व ऐरोलीमधील रुग्णालये बांधून तयार आहेत, परंतु कर्मचारी व आवश्यक यंत्रसामग्री नसल्याने ती पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. बेलापूर रुग्णालयात फक्त ओपीडी सुरू आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय हे एकमेव रुग्णालय सुरू आहे. त्यासाठी ३०० बेडची शासन मंजुरी आहे. पण प्रत्यक्षात ४०० बेडचे रुग्णालय चालविले जात आहे. शुक्रवारी रुग्णालयामध्ये ३३८ रुग्ण भर्ती झाले होते. ही संख्या अनेक वेळा ३६० ते ४०० पर्यंत जाते. वास्तविक जेवढे रुग्ण दाखल असतील त्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय व इतर कर्मचारीवर्ग आवश्यक असतो.
सद्यस्थितीमध्ये ३०० बेडसाठीही नियमाएवढे कर्मचारी उपलब्ध नाहीत. वाढीव बेड टाकल्यानंतर प्रत्यक्षात त्यांना योग्य सुविधा देता येत नाहीत. खासगी रुग्णालयांनी परवानगीपेक्षा एक बेड जास्त टाकला तरी पालिकेचा आरोग्य विभाग त्यांना नोटीस देते. त्यांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला जातो. पण प्रत्यक्षात स्वत:च्या रुग्णालयामध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करताना त्यांच्याकडे अग्निशमन विभागाचे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण दिले आहे. पण प्रत्यक्षात प्रथम संदर्भ रुग्णालयाकडेही या परवानग्या नाहीत. माता बाल रुग्णालयासाठीही परवानगी नाही. या नियमाप्रमाणे महापालिकेवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले जात आहे. पालिका रुग्णालयामधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारे मशीन १५ दिवसांपासून बंद आहे. शस्त्रक्रियेसाठी अनेक नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. आयसीयूमध्ये फक्त पाचच रुग्णांना ठेवता येते. एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटर बंद आहे. रुग्णालयातील चारपैकी दोन लिफ्ट सुरू आहेत. लिफ्ट चालविण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्तीच केलेली नाही. एक्सरे मशीनही बंद आहे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींची मागणी करूनही पूर्तता केली जात नाही. पालिका प्रशासनाला स्वत:च्या रुग्णालयांचा कारभार सुधारण्यास अपयश आले असल्याची तक्रार शासनाकडे केली आहे.
>महापालिकेवर कारवाई कोण करणार?
शहरातील खासगी रुग्णालयांनी एक बेड जास्त ठेवला तरी त्यांना महापालिका नोटीस पाठविते. त्यांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या रुग्णालयात तब्बल १०० बेड जास्त ठेवले आहेत. शुक्रवारीही क्षमतेपेक्षा ३८ रुग्ण जास्त भर्ती केले होते. डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे अग्निशमन दलाचे व एमपीसीबीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण ही दोन्हीही प्रमाणपत्रे महापालिकेच्या रुग्णालयांकडेही नाहीत. यामुळे आता महापालिका रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
>आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार
महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत. रुग्णालयामध्ये आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. याविषयी शिवसेनेचे तुर्भे नाका येथील शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. मनपा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना त्रास होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
>महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मंजुरीपेक्षा जास्त बेड ठेवले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे येथील डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. रुग्णालयाकडे अग्निशमन व पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र नाही. पूर्णपणे नियमबाह्यपणे कामकाज सुरू असून आयुक्तांनी सर्वप्रथम रुग्णालयांचे कामकाज नियमाप्रमाणे चालवून मग इतरांवर कारवाई करावी.
- संजू वाडे,
आरोग्य समिती सदस्य
>प्रथम संदर्भ रुग्णालयातील वास्तव
१०० बेडची परवानगी; प्रत्यक्षात मात्र ४०० बेड एनआयसीयू विभागातील सर्व व्हेंटिलेटर बंद अतिदक्षता विभागातील पाच व्हेंटिलेटर बंद मोतीबिंदू शस्त्रक्रिया मशीन १५ दिवसांपासून बंद रुग्णालयात औषधांचा तुटवडा एक्सरे मशीन अनेक दिवसांपासून बंद

Web Title: Unlawful functioning at the municipality hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.