बळीराजाचे नव्हे, हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य - उद्धव ठाकरे

By admin | Published: March 1, 2017 07:36 AM2017-03-01T07:36:53+5:302017-03-01T07:39:34+5:30

हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य म्हणावे लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे

Unlike the 'Baliaraja', this is the state of the farmers who took the 'victim' - Uddhav Thackeray | बळीराजाचे नव्हे, हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य - उद्धव ठाकरे

बळीराजाचे नव्हे, हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 01 - मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. सरकार बदलले असले तरी बळीराजाचे रुसलेले नशीब बदललेले नाही. तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या सरकारी धोरणांने केलेल्या ‘हत्या’च आहेत, असे कुणी म्हटले तर सत्ताधाऱ्यांकडे त्याचे काय उत्तर आहे? कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करायचा नाही आणि दुसरीकडे वरुणकृपेने फुललेल्या शेतमळ्यातील पीक कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणायची. हे बळीराजाचे राज्य नव्हे. हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणाऱ्यांचे राज्य म्हणावे लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे.
 
महाराष्ट्रावर या वर्षी वरुणराजाने कृपावृष्टी केली. त्यात पुन्हा राज्यातील सत्ताधाऱ्यांनीही जलसिंचनाच्या कामाबाबत बऱ्याच वल्गना केल्या. त्यामुळे राज्यातील बळीराजाच्या मानेभोवती आवळला गेलेला आत्महत्येचा फास निदान या वर्षी तरी सैल होईल अशी अपेक्षा होती, मात्र कसचे काय अन् कसचे काय! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला काही तयार नाही. मराठवाड्यात तर दर दिवशी दोन शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा केंद्रबिंदू मराठवाडा झाला आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारीत असते. आताही जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्या विषयी स्व-कौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले, पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारलाच द्यावे लागेल. किंबहुना सध्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या अधिकगंभीर आणि चिंताजनक आहेत. कारण त्या कर्जबाजारीपणा किंवा नापिकीमुळे होत नसून शेतमालाच्या पडलेल्या भावांमुळे होत आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
वरुणराजाच्या कृपेने पाच-सहा वर्षांनंतर प्रथमच मराठवाड्यातील शेतीशिवारे फुलली, पीकपाणी चांगले झाले, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या समाधानाचे हसू फुलूच द्यायचे नाही असा चंगच जणू राज्यातील भाजप सरकारने बांधला आहे. त्यामुळेच शेतमालाचे भाव पडले आणि बळीराजाचे फुललेले नशीबही मावळले. त्यामुळे मागील दोन महिन्यांत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा ११७ वर पोहाचला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
मोदी सरकारच्या नोटाबंदीचा वरवंटा ऐन सुगीच्या हंगामात फिरला. त्यामुळे पडेल त्या किमतीला खरीपाचे पीक व्यापाऱ्यांच्या तागडीत ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खते घेण्याचीही मारामार झाली. त्याचीच परिणती आज मराठवाडय़ात दर दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येत झाली आहे. तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांचीही अवस्था खरेदी केंद्रे बंद करून राज्य सरकारने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी केली आहे. ही खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी हजारो शेतकऱ्यांचे व्हायचे ते आर्थिक नुकसान झालेच आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 

Web Title: Unlike the 'Baliaraja', this is the state of the farmers who took the 'victim' - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.