स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची विनापरवानगी छपाई!

By admin | Published: May 30, 2017 02:08 AM2017-05-30T02:08:03+5:302017-05-30T02:08:03+5:30

अकोल्यातील सात पुस्तक विक्रेते गजाआड : एस. चांद प्रकाशनच्या पुस्तकांची होत होती विक्री

Unmatched printing of competition examination books! | स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची विनापरवानगी छपाई!

स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची विनापरवानगी छपाई!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला-पुस्तक खरेदी आणि विक्रीचा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार असलेल्या चिवचिव बाजारातून दिल्ली येथील एस. चांद प्रकाशनच्या नावावर पुस्तकांची अवैध छपाई करून विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने सोमवारी छापेमारी केली.
यावेळी सात पुस्तक विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दिल्ली येथील एस. चांद ही प्रकाशन कंपनी देशभरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभियांत्रिकी, सामान्य ज्ञान यासह विविध प्रकारच्या शासकीय नोकरीसंदर्भातील पुस्तकांचे प्रकाशन करते. मात्र, या कंपनीच्या नावावर बनावट पुस्तकांची छपाई करून अकोल्यातील चिवचिव बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्रकाशकांना मिळाली. यावरून एस. चांद प्रकाशन कंपनीचे संजीवकुमार राघव यांनी या प्रकाराची माहिती घेतली.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्याकडे तक्रार केली. अळसपुरे यांनी संपूर्ण प्रकरणाचा गत आठ दिवसांपासून सखोल तपास केला, त्यानंतर दिल्ली येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुस्तक विक्रेत्यांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी सात पुस्तक विक्रेत्यांकडून एस. चांद प्रकाशनाच्या नावावरील बनावट पुस्तकांची विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले. या सात पुस्तक विक्रेत्यांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या पुस्तक विक्रेत्यांकडून तब्बल १ लाख ५४ हजार ९३६ रुपयांची पुस्तके जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडे आणखी बनावट पुस्तकांचा साठा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सात पुस्तक विक्रेत्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४७४ आणि प्रतिलिपी अधिकार अधिनिीयमाच्या कलम ६३ आणि ६४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाशकांच्या तक्रारीनंतरच होते पोलीस कारवाई
राज्यासह देशात प्रतिलिपी अधिकार अधिनियमाचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात बनावट पुस्तकांची छपाई करून विक्री करण्यात येत आहे; मात्र यावर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रकाशनाचे संचालक यांची तक्रार आवश्यक आहे. प्रकाशकांची तक्रार आल्यानंतरच पोलीस कारवाई करण्यात येते. सोमवारी अकोल्यातील कारवाईही पुस्तक प्रकाशकांच्या तक्रारीनंतर करण्यात आली.

पुस्तक विक्रेत्यांकडे दोन वेळा पडताळणी
दिल्ली येथील एस. चांद प्रकाशनाचे संजीवकुमार राघव यांना चिवचिव बाजारातून बनावट पुस्तकांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वत: पडताळणी केली. त्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी बनावट पुस्तक विक्रीसंदर्भात गत ८ दिवसात दोन वेळा पडताळणी केल्यानंतर सोमवारी ही कारवाई केली.
हे आहेत अटकेतील पुस्तक विक्रेते
विजय बुक डेपोचे संचालक विजय भीमराव जाधव, अग्रवाल बुक स्टॉलचे संचालक हरीशकुमार भगवानदास अग्रवाल, हरणे बुक स्टॉलचे संचालक महेंद्र सुधाकर हरणे, श्री पुस्तक घरचे संचालक श्रीकांत चंद्रभान डाबरे, मराठा बुक्सचे संचालक गोपाळ प्रभाकर हरणे, चेतन बुक स्टॉलचे वासुदेव सांगोळे, श्री साई बुक्सचे संचालक पंकज वासुदेव सांगोळे या सात पुस्तक विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.

दहा वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा
सात पुस्तक विक्रेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या भारतीय दंड विधानाच्या गुन्ह्यात तसेच प्रतिलिपी अधिकार अधिनियमाच्या उल्लंघन प्रकरणात पुस्तक विक्रेत्यांना दहा वर्षांपासून ते आजन्म कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. हा प्रकार पोलिसांनी पुस्तक विक्रेत्यांच्या लक्षात आणताच त्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते; मात्र त्यासाठी आता या प्रकरणाचा तपास खमक्या पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज आहे.

प्रतिलिपी उल्लंघनाची पहिलीच पोलीस कारवाई
प्रतिलिपी अधिकार अधिनियमाची पोलिसांकडून करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे. राज्यातील बहुतांश पुस्तक विक्रेत्यांकडून बनावट पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या पोलीस कारवाई करण्यास अडचण असल्याने कारवाई होत नाही. या प्रकरणात प्रकाशकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने विशेष पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Unmatched printing of competition examination books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.