भाजपाला मोठा धक्का, उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!
By विलास बारी | Published: April 3, 2024 12:50 PM2024-04-03T12:50:05+5:302024-04-03T12:51:05+5:30
Lok Sabha Election 2024 : मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकीटासाठी नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.
जळगाव : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. तसेच, भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात धरला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाने उन्मेष पाटील तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. यादरम्यान मंगळवारी त्यांनी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते.
यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज नाही. तर माझ्या कामाची किंमत करण्यात आली नाही. मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकीटासाठी नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. याचबरोबर, तुमच्या आणि माझ्या भावना सारख्याच आहेत. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी जात्यात आहे अनेकजण सुपात - उन्मेष पाटील
ही लढाई पदाची जय-विजयाची नाही, ही लढाई आत्मसन्मानाची आहे. विकासाची लढाई आहे. तिथे आत्मसन्मान, संवाद होत नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. आज मी जात्यात आहे, तर अनेकजण सुप्यामध्ये आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात सुप्यातील अनेकजण पुढे येतील, असे उन्मेष पाटील यांनी पक्ष प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.