विनाकारण हॉर्न; २ हजार दंड
By admin | Published: June 30, 2017 02:00 AM2017-06-30T02:00:15+5:302017-06-30T02:00:15+5:30
विनाकारण तसेच शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणाऱ्यांना लगाम लावायचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशांवर दोन हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विनाकारण तसेच शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणाऱ्यांना लगाम लावायचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशांवर दोन हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अॅण्ड रोड सेफ्टी अॅक्ट, २०१७मध्ये करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी आता राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
चालकांनी अनावश्यक, सतत किंवा गरजेपेक्षा अधिक काळ हॉर्न वाजवल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. मल्टीटोन हॉर्न, वाहन चालवताना अलार्मसारखा आवाज येणे इत्यादींवरही कारवाई करण्यात येणार आहे. याच कायद्याच्या कलम २३ अंतर्गत यानियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.
नियमांचे सर्रास होते उल्लंघन-
उत्सव काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते, तरी संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याने उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती.
गुरुवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला मुंबई व नागपूरसह राज्यातील १० महानगरांच्या आवाजाच्या पातळीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये आवाजाची पातळी मोजण्याचे काम सुरू झाले असून त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भार्इंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि पनवेलमध्ये एका आठवड्यात हे काम सुरू होईल, असे त्यांनी कोर्टाला सांगितले.