दहावी नापास विद्यार्थ्यांकडून असरचे अशास्त्रीय सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:28 AM2019-01-16T06:28:39+5:302019-01-16T06:28:52+5:30
‘असर’चा अहवाल : सोलापूरच्या डिजिटल शिक्षकाचा दावा
मुंबई : राज्यातील शाळांची शैक्षणिक परिस्थिती आणि त्यांचा आढावा घेणारा असरचा अहवाल हा अशास्त्रीय पद्धतीचा असल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीत डिसले यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यापूर्वी शिक्षक, मुख्याध्यापक, गावच्या सरपंचाची परवानगी घेतली का, तसेच गावांची कोणत्या पार्श्वभूमीवर निवड केली, असे प्रश्न विचारत त्यांनी उपस्थित केले आहेत.
याचसोबत शाळांची पाहणी ही दहावी नापास विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रथम संस्थेने किंवा शासनाने शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या केलेल्या पाहणीतून समोर आलेली आकडेवारी सामान्यांसाठी जाहीर करावी, निष्कर्ष मांडू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रणजीत डिसले संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत म्हणून काम करत आहेत.
सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तींना ६-१४ वयोगटातील मुलांना शिकवण्याचा किती तासांचा अनुभव आहे, मुलांशी संवाद साधत शैक्षणिक कौशल्याबाबत अपेक्षित प्रतिसादाचे कौशल्य या सर्वेक्षकांकडे आहे का? मुलांना वाचता आले नाही किंवा एखादे गणित सोडवता आले की नाही हा निष्कर्ष कोणत्या माहितीच्या आधारे काढला गेला, याचे उत्तर अहवालातून मिळत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. सोबतच जिल्हा परिषद शाळा, खोमणार येथील शिक्षक दिगंबर तोडकर यांनी पाहणीसाठी आलेल्या कार्यकर्त्याची माहिती विचारली असता त्याने तो दहावी नापास असल्याची कबुली दिल्याचे वास्तव समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे असरच्या पाहणीचे वास्तव आणि त्यातून निघणाºया निष्कर्षावर कसा विश्वास ठेवावा, असा सवाल त्यांनी केला आहे.
असरच्या पाहणीसाठी आलेल्या विद्यार्थी आणि अधिकाºयांकडे गटशिक्षणाधिकारी किंवा सरपंच यांच्याकडचे पत्र नसल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांच्याकडे कोणतीही प्रश्नपत्रिका नव्हती, केवळ शाळा पाहणीसाठी ते प्रतिनिधी असल्याचे सांगत होते. घरी जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी करणार असल्याचे सांगत ते तेथेही गेले नसल्याचे आढळले. त्यामुळे अहवालात केवळ कागदी घोडे नाचविले जाणार असतील तर हे सर्वेक्षण नेमके कशासाठी, हा प्रश्नही अन्य शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला.
यासंदर्भात प्रथमच्या संचालिका उषा राणे यांची प्रतिक्रिया विचारता, या आरोपात काहीही तथ्य नसून सर्वेक्षणास गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत सर्व विद्यार्थी हे किमान १२ वी पास असून अशास्त्रीय पद्धत सर्वेक्षणास वापरली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.