असंघटित कष्टकऱ्यांना आर्थिक,सामाजिक पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पॅकेजची गरज : डॉ. बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:24 PM2020-06-01T14:24:39+5:302020-06-01T14:38:09+5:30
देशातील कोट्यवधी असंघटित मजूर,कामगारवर्गाला पत देता न आल्यामुळेच कोरोनाच्या आपत्तीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.
विवेक भुसे-
पुणे : लोकशाही समाजवादावर आधारित स्वराज्य बनविण्याचे स्वप्न पाहून आमची पिढी समाजाकारणात उतरली होती़ पण, गरीबी कमी होण्याऐवजी गरीब कमी होतगेले. कोरोनामुळे समाजातील जाती, धर्म, लिंगभेदाची ही सामाजिक, आर्थिक उतरंड बटबटीतपणे समोर आली आहे. देशातील कोट्यवधी असंघटित मजूर,कामगारवर्गाला पत देता न आल्यामुळेच कोरोनाच्या आपत्तीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अशा मजूरांना हजारो किमी पायी चालत गावी जाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने केवळ पैशाचे पॅकेज दिलेआहे.असंघटित वर्गाला असे पॅकेज नको तर त्यांना पत प्रतिष्ठा देणारे पॅकेज हवे आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबा आढाव हे सोमवारी १ जूनला ९० वर्ष पूर्ण करुन ९१ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्यानिमित्ताने 'लोकमत 'शी संवाद साधताना आढाव म्हणाले, स्वातंत्र्यानंतर घटनेनेच सर्वांना समान मताचा अधिकार देण्यात आला. पणत्याबरोबर सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा व लोकशाही समाजवादाचे स्वप्न आम्ही तरुणांनी तेव्हा पाहिले होते. त्यादृष्टीने जो प्रयत्न केलागेला पाहिजे होता, त्याचा वेग खूप कमी होता. त्यातूनच या असंघटित लोकांना गोळा करुन त्यांना पत मिळवून देण्याचा प्रयत्न मी आपल्या आजवरच्या जीवनातकेला. संघटनेच्या पातळीवर आज हमाल, मापाडी, कागद, काच पत्रा गोळाकरण्याचे काम करणारे, रिक्षाचालक या असंघटितांना समाजात पत मिळली आहे.
स्वातंत्र्यानंतर उद्योगधंदे वाढले, त्याचबरोबर गरीब -श्रीमंतामधील विषमता वेगाने वाढली. भांडवलशाहीतून संपत्ती निर्माण करुन तीगरीबांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार करण्यात आला होता पण झाले उलटे. साडेतीनशे लोकांकडे देशातील एकूण संपत्तीपैकी ७१ टक्के संपती एकवटली गेली आहे. पत कशावर तर ७/१२वर अशा घोषणा देत त्याकाळी शेतकºयांनी जमिनीच्याफेरवाटपाची मागणी केली होती. पण उद्योगधंदे,विकास कामाच्या नावाखाली त्यांच्याकडे असलेल्या जमिनी काढून घेतल्या गेल्या. आता तर सर्व पक्षमुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक बनले आहेत. त्यामुळे समाजवादाची भाषा केवळ घटनेपुरती शिल्लक राहिली आहे.
कोरोनामुळे समाजातील ही विषमता अधिक बटबटीतपणे समोर आली, असे सांगून बाबा आढाव म्हणाले, शेतमजूर, आदिवासी, कष्टकऱ्यांना सामाजिक, आर्थिक पत मिळू न शकल्यामुळेच त्यांचे काही प्रश्न असू शकतील, याकडे लॉकडाऊन लागू करताना दुर्लक्ष केले गेले. त्यातून हजारो कामगारांना शेकडो किमी पायी चालत गाव गाठण्याची वेळ आली. वास्तवाचे भीषण चित्र समाजापुढे आले. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, कोरोनाच्या आपत्तीत जो असंघटितवर भरडला गेला आहे. त्याला आर्थिक,सामाजिक पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पॅकेजची खरी गरज आहे.
* पूर्वी आम्ही सर्व भारतीय आमचे बांधव आहेत, अशी प्रार्थना म्हणतो होतो़. आता मी हिंदु असल्याचा गर्व आहे, असे म्हटले जात आहे. हाताची सर्वबोटे सारखी नसतात, असे सांगून समाजातील जाती व्यवस्था, सामाजिक विषमतेचेसमर्थन केले जात आहे.
* आम्ही बिल गेटसचे कौतुक करतो़ नवे तंत्रज्ञान आत्मसात करत नाहीत. देशातील बुद्धीमान लोक परदेशात पाणी भरत आहेत.
* महाराष्ट्राने देशाला हमाल माथाडी कायदा आणि रोजगार हमी योजना देशाला दिली. आज गावाला परत गेलेल्या लोकांसाठी मनरेगा सुरु करा अशी मागणी केली जात आहे.
* छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्हालाही प्रेरणा मिळते. आमचा हमालदरवर्षी मोठी मिरवणुक काढतो. पण त्यापुढचा इतिहासही तितकाच महत्वाचा आहे. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आमच्या हाती लेखणी दिली़आज शनवारवाड्याच्या डागडुजीला निधी मिळतो. पण, ज्या वाड्यातसावित्रीबाईनी बहुजनाच्या हातात पुस्तक दिले. त्या वाड्याचा प्रश्नकोर्टात खिचपत पडला आहे.
* आता बदलेल्या तंत्रज्ञानात तुमचा अंगठा हाच पासवर्ड आणि तुमची ओळख झाली आहे. पण ५० वर्षापूर्वी अंगठेबहाद्दर असल्यामुळे हमालाना बँकेत खातेउघडण्यास नकार दिला गेला होता. त्यावेळी बाजीराव रोडवरील बँकेसमोर आपल्याला मोर्चा काढावा लागला होता, अशी आठवण यावेळी बाबा आढाव यांनी सांगितले.