न लाभलेले सर्वोत्तम अध्यक्ष

By admin | Published: December 31, 2015 01:07 AM2015-12-31T01:07:09+5:302015-12-31T01:07:09+5:30

आशयघन कवितांमधून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी सारस्वतांच्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेच नाहीत. साहित्य संमेलनाध्यक्षाची

Unprofitable best president | न लाभलेले सर्वोत्तम अध्यक्ष

न लाभलेले सर्वोत्तम अध्यक्ष

Next

पुणे : आशयघन कवितांमधून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी सारस्वतांच्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेच नाहीत. साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढविणारच नाही, या आपल्या तत्त्वाशी ते आयुष्यभर ठाम राहिले. त्यामुळे ते न लाभलेले सर्वोत्तम अध्यक्ष ठरल्याची सल काव्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
पुण्यातील ८३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पाडगावकरांची काव्यमैफल अजरामर ठरली होती. साहित्यावरील प्रेमापोटी त्यांनी सासवडमधील साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनालाही भेट दिली, तर मराठी बालकुमार साहित्य संमेलन आणि विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. मात्र, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते अखेरपर्यंत
दूर राहिले. संमेलनाध्यक्षांची
निवड लोकशाही प्रक्रियेतून
होते. मात्र, ‘मला निवडून द्या,
असे मी कोणालाही सांगणार
नाही,’ अशी त्यांची ठाम भूमिका होती. बिनविरोध निवड होणार असेल, तरच संमेलनाध्यक्ष होणे आपल्याला आवडेल, असे ते अखेरपर्यंत म्हणत. आपल्या काव्यप्रतिभेने जगण्यावर प्रेम करायला शिकविताना, त्यांनी आपल्या तत्त्वांवरही आयुष्यभर प्रेम केले.
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी होणारी धामधूम त्यासाठी साहित्य वर्तुळात चाललेले कुरघोड्या आणि आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण कविवर्य पाडगावकरांना मान्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यापासून प्रकर्षाने दूर राहणेच पसंत केले. त्यांच्या अनेक स्नेही आणि हितचिंतकांनी त्यांना अध्यक्ष होण्यासाठी गळ घातली होती. मात्र, ‘मी निवडणुकीचा अर्ज भरणार नाही,’ यावर ते ठाम होते.

मंगेश पाडगावकर संमेलनाध्यक्षपदापासून दूर राहिले, याची कायमच खंत वाटते. आम्ही अध्यक्षपदासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र, निवडणुकीला उभे राहणे त्यांना मान्य नव्हते. ‘तुम्ही उमेदवार असाल तर इतर कोणीही अर्ज भरणार नाही,’ असे आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची तयारी नव्हती.
- डॉ. सतीश देसाई

संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया काही प्रतिभावंतांना पचणारी नसते, पण लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला पर्याय नसतो. पाडगावकरांची प्रवृत्ती, पिंड मूल्यात्मकदृष्ट्या लोकशाहीवादी असला, तरी निवडणुकीची रणधुमाळी त्यांना मान्य नव्हती. तरीही माझ्या दृष्टीने पाडगावकर संमेलनाध्यक्षपदापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे, सांस्कृतिक कर्तृत्व सिद्ध केलेले प्रतिभावंत आहेत. ज्याप्रमाणे, शरद पवार जसे जनतेच्या हृदयातील पंतप्रधान आहेत, त्याचप्रमाणे मंगेश पाडगावकर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर न बसलेले, परंतु त्याहून अधिक क्षमता असलेले अध्यक्षांचे अध्यक्ष आहेत.
- श्रीपाल सबनीस, नियोजित अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Web Title: Unprofitable best president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.