पूर्व द्रुतगती मार्गावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 02:10 AM2017-01-16T02:10:26+5:302017-01-16T02:10:26+5:30
‘पंतनगर जंक्शन’ येथील सुमारे २ एकर जागेवरील नर्सरी, वाहनतळ, खडी-रेतीवाले ही अनधिकृत बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली
मुंबई : अंधेरी-घाटकोपर व पूर्व द्रुतगती महामार्गाच्या नाक्यावरील ‘पंतनगर जंक्शन’ येथील सुमारे २ एकर जागेवरील नर्सरी, वाहनतळ, खडी-रेतीवाले ही अनधिकृत बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली; तसेच भूमाफिया मोहम्मद कल्लू शाह याच्याविरुद्ध एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन एकरच्या भूखंडावर महापालिकेची वेगवेगळी आरक्षणे असून, त्यामध्ये रस्ता, अग्निशमन दल, महापालिका रुग्णालय, महापालिका दवाखाना व हरित पट्टा या आरक्षणांचा समावेश आहे. गेल्या ८-१० वर्षांपासून या भूमाफियाने या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभारली होती. तसेच नर्सरी, खडी-रेतीवाले, वाहनतळ अशा निरनिराळ्या व्यावसायिकांच्या वापराकरिता ही जागा त्याने भाड्याने दिली होती. भूमाफियाने ३० ते ४० खोटी प्रकरणे न्यायालयात दाखल करून महापालिकेची तसेच न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम केले होते. या भूमाफियाविरुद्ध अनेक वर्षांपासून तक्रारी दाखल होत्या, तसेच तो अवैध व्यवसायांस प्रोत्साहन देत असल्याने, नागरिकांचाही त्याच्यावर रोष होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ही कारवाई करण्यासाठी ६ जेसीबी, २ पोकलेन, खासगी व महापालिकेचे १५ डम्पर, ५० पोलीस, २० पोलीस अधिकारी व महापालिकेचे १०० कर्मचारी यांची मदत घेण्यात आली. मोकळा करण्यात आलेला व विविध आरक्षणे असलेला २ एकरचा भूखंड महापालिकेने ताब्यात घेतला असून, त्यास कुंपणही घातले आहे. तसेच लगतची ‘बेस्ट’ची जमीन ‘बेस्ट’कडे सुपुर्द करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)