शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत; घोषणा अधिवेशनात? राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 07:09 AM2023-11-30T07:09:13+5:302023-11-30T07:09:21+5:30
Unseasonal Rain In Maharashtra: राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, आधी सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे एकत्रित प्रस्ताव सादर झाल्यानंतरच मदत दिली जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मदतीची घोषणा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरीत्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
तातडीने प्रस्ताव सरकारकडे पाठवा
पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांच्या नुकसानीच्या भरपाईचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.
पंचनाम्यास चार ते पाच दिवसांचा वेळ
नुकसानीचे पंचनामे तयार होण्यास आणखी चार-पाच दिवस लागतील. त्यानंतरच नुकसानीची नेमकी आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मदतीचे सूत्र निश्चित केले जाईल. हे लक्षात घेता हिवाळी अधिवेशनात मदतीच्या घोषणेची शक्यता आहे.