उन्हाळ्यात अवकाळी, पिकांची झाली माती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 09:35 AM2024-04-01T09:35:17+5:302024-04-01T09:37:50+5:30
Unseasonal Rain In Maharashtra: विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळद, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.
नांदेड/गडचिरोली - विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळद, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यामुळे शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अधिक नुकसान झाले. काढणीस आलेल्या हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे. परभणीमध्येही शनिवारी रात्रीच्या वादळामुळे झाडे उन्मळून पडली. रब्बी हंगामातील काही पिकांचे नुकसान झाले. रविवारी सकाळपर्यंत परिसरात ४.२ मिलिमीटर पाऊस झाला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही वादळामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे.
वीज कोसळून दोन ठार
बीड/सातारा : पाथरवाला बु. (ता. गेवराई, जि. बीड) येथील श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे (१८) हा युवक शनिवारी रात्री उसाला पाणी देत होता. यावेळी वीज तरुणाचा मृत्यू झाला. आलेवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील गणेश दुटाळ (३४) हा ज्वारी काढत असताना वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.