भग्नावस्थेत हरवतेय हडसरचे वेगळेपण
By Admin | Published: May 4, 2017 12:00 AM2017-05-04T00:00:21+5:302017-05-04T00:00:21+5:30
जुन्नर तालुक्यातील हडसर ऊर्फ पर्वतगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारण ४६८७ फूट आणि कोरीव
अशोक खरात / खोडद
जुन्नर तालुक्यातील हडसर ऊर्फ पर्वतगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारण ४६८७ फूट आणि कोरीव प्रवेशद्वारांनी आपले वेगळेपण जपणारा किल्ला आहे. शहाजी सागर (माणिकडोह धरण) ओलांडून पुढे जाऊन हडसर गाव लागते. जुन्नर ते हडसर हे अंतर साधारण १६-१७ किमी आहे. जुन्नरमधील एकूण किल्ल्यांच्या यादीतील हडसर किल्ल्याच्या अभेद्य कोरीव वाटा हे वैशिष्ट्यच मानले जाते.
किल्ले पठारावरील खोदीव धान्य कोठारे, कातळाच्या पोटात लपलेले कोरीव पायरीमार्ग, जीर्ण गडदेवीचे मंदिर आणि एक शिवमंदिर, पूर्वेकडील खिळ्याची वाट असे बांधकाम शैलीचे स्वत:चे वैशिष्ट्य जपणारा किल्ले हडसर इतिहासाविषयी खूपच अबोल आहे. कोरीव दरवाजे, पायऱ्या आणि धान्य कोठार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बालेकिल्ल्यावरीलएक छोटेखानी तळ्याच्या बाजुने आपण पुढे गेल्यानंतर एक जुने जाणते शंभुचे मंदिर दिसते.
मंदिराच्या पूर्वेला खूप सारे दगडी चौथरे इथल्या मानवी वस्तीचा पुरावाच देत आहेत. पायवाटेने थोडेसे उत्तरेकडे गेलो असता भग्नावस्थेत असलेले पण अवशेषांवरून पूर्वीच्या भव्यतेची कल्पना यावी, असे बऱ्यापैकी मोठे देवीचे मंदिर आहे. देवी मंदिराच्या पूर्वेकडे अशाच अवस्थेतील मारुतीचे मंदिर आहे. एक तुटलेल्या अवस्थेत असलेली तटबंदीची भिंत आणि बाजुने खाली उतरणारी पाऊल वाट खिळ्यांच्या वाटेकडे जाते. हडसर किल्ल्याच्या पठारावरील पूर्व भागातील एकंदरच बांधकामाचे अवशेष बघता, मंदिराची भव्यता बघता इथे तत्कालीन वेळी राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असावे, असे वाटते.
हडसर किल्ल्यावरील उर्वरित अवशेष बघता, इथे इतिहास फारसा बोलत नाही, असं दिसतं. उपलब्ध डोंगर कपार आणि खडकाचा खूप प्रभावीपणे केलेला वापर हीच हडसरची खासियात म्हणावी लागेल. इथे बांधकाम करण्याऐवजी डोंगर कोरून पायरी मार्ग, धान्य कोठारे इ बनविण्यात आली आहेत. पश्चिमेकडील बाजुने डोंगर पोटात लपलेली राजवाटने पुढे बालेकिल्ल्यावर घेऊन येते.