अल्पवयीनांच्या हाती बेफाम दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:21 AM2017-08-07T03:21:50+5:302017-08-07T03:23:46+5:30

पाठीवर शाळेचे दफ्तर... डोळ्यांवर स्टायलिश गॉगल... पाठीमागे डबल व ट्रीपल सीट ... या अवस्थेत कर्कश हॉर्न वाजवत बेफाम होऊन दुचाकी पळवायची... असे चित्र शहरातील शाळा, खासगी शिकविण्या, उद्याने आदी परिसरात सर्रास पहायला मिळत आहेत. या अल्पवयीन मुला-मुलींकडून धूम स्टाईलने दामटली जात आहे.

Unstoppable bikes in the hands of minors | अल्पवयीनांच्या हाती बेफाम दुचाकी

अल्पवयीनांच्या हाती बेफाम दुचाकी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पाठीवर शाळेचे दफ्तर... डोळ्यांवर स्टायलिश गॉगल... पाठीमागे डबल व ट्रीपल सीट ... या अवस्थेत कर्कश हॉर्न वाजवत बेफाम होऊन दुचाकी पळवायची... असे चित्र शहरातील शाळा, खासगी शिकविण्या, उद्याने आदी परिसरात सर्रास पहायला मिळत आहेत. या अल्पवयीन मुला-मुलींकडून धूम स्टाईलने दामटली जात आहे. त्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात असताना वाहतूक पोलिसांकडून केवळ समज देण्याची ‘कारवाई’ केली जाते. पालकांच्या निर्धास्तपणामुळे अल्पवयीन मुलांच्या दुचाकींने अपघाताचे धोका वाढत आहे.
चिंचवड, आकुर्डी, निगडी, पिंपरी, काळेवाडी तसेच सांगवी परिसरात सकाळपासूनच इयत्ता दहावी, बारावीमधील विद्यार्थी ट्यूशन क्लासनिमित्त घराबाहेर पडतात. शिकवणीला जाण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांजवळ दुचाकी आहेत. सकाळच्या सुमारास घराबाहेर पडणारा विद्यार्थी त्यांचे पालक झोपेत असतानाच दुचाकी वाहने घेऊन शिकवणी वर्गासाठी जातात. त्यामुळे आपला पाल्य दुचाकी कशाप्रकारे चालवतो याविषयी पालक अंधारातच असतात, तर काही पालकांचा दुचाकी चालवण्यास पाठिंबा असल्याचेही दिसून येते. शिकवणी वर्ग घरापासून दूर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने काही पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी दुचाकी खरेदी करून दिली आहे.
सायकलने शिकवणी क्लासला जाणे अशक्य होत असून, त्याचा परिणाम अभ्यासावर होत असल्याने दुचाकीने शिकवणीला गेल्यास चुकीचे काय, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र, ही मुले शिकवणीला जाताना शिकवणी वर्ग सुटल्यावर दुचाकी वेगाने चालवण्याच्या शर्यती लावतात. वेगाने दुचाकी अन्य वाहने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून या मुलांच्या अन्य नागरिकांच्या जीवावर बेतू शकते, याची कल्पना या मुलांसह त्यांच्या पालकांनाही नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मुलांना दुचाकी वाहने चालवण्यासाठी देताना पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सायकली झाल्या गायब
शाळा व कॉलेजमधील सायकली गायब होऊन दुचाकी नेणाºया विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आपला पाल्य नववीत गेला की लगेच त्याला दुचाकी घेऊन दिली जात आहे. शाळेतून ये-जा करण्यासाठी सर्रास या दुचाकींचा वापर होतो. यात मोपेड तसेच २५० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. ही मुले हेल्मेटदेखील वापरत नाहीत. आकरावी-बारावीमध्ये शिकणाºया काही बड्या घरातील मुलांकडून थेट चारचाकी आणली जाते. या मुलांकडे कोणताही परवाना नसतो. मात्र, तरीही त्यांना पालक, पोलीस किंवा शाळा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आडकाठी अथवा विचारणा केली जात नाही.

कायदा काय सांगतो
मोटार वाहन कायदा १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविणाºया १८ वर्षांखालील मुलांसंदर्भात वाहनमालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ४ पोट कलम (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी ५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाºया व्यक्तीस व कलम १८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वीस वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही. तरीही बिनधास्तपणे अशी वाहने चालविली जात आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाणही आहे.

शिक्षा काय होऊ शकते?
लोकसभेत मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. राजस्थानचे वाहतूकमंत्री युनूस खान यांच्या अध्यक्षतेखाली देशातील १८ राज्यांच्या वाहतूकमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने विधेयकात दुरुस्ती सुचवली. या सूचनांचा या विधेयकामध्ये समावेश करण्यात आला आहे. यानुसार पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रुपये दंड, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद करण्यात अली आहे.

यापुढे शाळा परिसर आणि इतर ठिकाणी नियमित तपासणी करून अशा अल्पवयीन वाहनचालकांवर आणि त्यांच्या पालकांवर कडक कारवाई करण्यात येईल. नियमबाह्य वाहतुकीच्या विरुद्ध कठोर पावले उचलली जातील.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

अल्पवयीन दुचाकीचालकांच्या विरोधात आपली कारवाई सुरूच आहे. शाळा परिसरातील अशा बेदरकार वाहनांना आळा घालण्यासाठी तसेच अल्पवयीन चालक व त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. - राजेंद्र भामरे,
सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
 

Web Title: Unstoppable bikes in the hands of minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.