कर्जमाफी होईपर्यंत ‘संघर्ष’ सुरूच!
By admin | Published: April 7, 2017 05:24 AM2017-04-07T05:24:59+5:302017-04-07T05:24:59+5:30
कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.
कऱ्हाड (जि. सातारा) : ‘कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेसाठी मुहूर्त न शोधता त्वरित घोषणा करावी,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कऱ्हाड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, ते स्पष्ट होते. आम्ही विरोधी पक्षात असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी लावून धरली. पण १९ आमदारांना निलंबित करण्याचे पाप सरकारने केले. तमिळनाडू व उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना काही अटी, शर्ती घालून कर्जमाफी केली. पण महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी हवी आहे; आणि ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’’
सभागृहामध्ये कितीही मुद्दे मांडले तरी हे सरकार त्याला दाद देत नाही. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधकांनी चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले असून, संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात ही संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>...तर मी त्यांना पहिला हार घालेन
सुरुवातीला कर्जमाफीला विरोध करणारे मुख्यमंत्री आता योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेईन, असे सांगतात. परंतु त्यांची ही योग्य वेळ अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर येणार आहे? शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांनी जर संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मी पहिल्यांदा त्यांना हार घालून अभिनंदन करेन. - आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री