"जोवर कायदा होत नाही, तोवर प्रत्येक सनातनी व्यक्तीने 5-6 मुलांना जन्माला घालावे;" देवकीनंदन ठाकुर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 06:26 PM2023-02-19T18:26:09+5:302023-02-19T18:56:12+5:30
"4 बायका आणि 40 मुलांसारख्या प्रकरणांवर कुणीही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावरच झाले आहे."
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासंदर्भातील वक्तव्यावरून भागवत कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी व्यक्तीने पाच ते सहा मुलांना जन्माला घालायला हवे. असे देवकीनंदन ठाकुर यांनी म्हटले आहे. ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी सनातन मंडळ स्थापन करण्याची मागणीही केली. एवढेच नाही, तर या मंडळात केवळ धर्माचार्यच असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावर झाले -
देवकीनंदन ठाकुर म्हणाले, लोकसंख्येवर आजपर्यंत नियंत्रण येऊ शकलेले नाही. लोकसंख्येचा केवढा मोठा स्फोट झाला आहे, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. 4 बायका आणि 40 मुलांसारख्या प्रकरणांवर कुणीही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावरच झाले आहे.
...तोवर अधिकाधिक मुलं जन्माला घाला -
"माझे म्हणणे आहे की, जोवर लोकसंख्या नियंत्रण कायदा येत नाही, तोवर प्रत्येक सनातनीने अधिकाधिक मुलांना जम्माला घालावे. यासाठी वेळेवललग्न करा आणि पाच ते सहा मुलांना जन्माला घाला," असे देवकीनंदन ठाकुर यांनी म्हटले आहे.
गेल्यावर्षी मिळाली होती बॉम्बने उडवण्याची धमकी -
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांना परदेशातून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.