चिऊ पार्कमध्ये बोधचिन्हाचे अनावरण
By admin | Published: July 10, 2017 04:02 AM2017-07-10T04:02:10+5:302017-07-10T04:02:10+5:30
चिमण्यांच्या संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या चिऊ पार्कमध्ये बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रोटरी क्लब आॅफ डोंबिवली पश्चिमतर्फे घरडा सर्कल भागात चिमण्यांच्या संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या चिऊ पार्कमध्ये बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टसमधील प्रोफेसर असलेल्या नितीन शास्त्री यांनी हे बोधचिन्ह तयार केले. ते फायबर ग्लासपासून बनविले असून त्याचे डिझाईन राजीव मोहिते यांनी तयार केले आहे. या बोधचिन्हासाठी १० ते १२ लाख खर्च आला असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी पार्क ची मूळ संकल्पना मांडणारे दीपक काळे, पार्क समिती सदस्य सचिव के. सुब्रमणियम, राजीव मोहिते, राजसी मोहिते, नितीन सावंत, डॉ. प्रल्हाद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. उपाध्ये यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या पार्कचा मी स्वत: प्रचार व प्रसार करणार आहे, असे सांगितले. मुलांना या पार्कमध्ये घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी केले.
संदेश चिमण्या वाचवण्याचा
२२ गुंठ्यात हा प्रकल्प उभा असून तेथे ५०० झाडे लावण्यात आली आहेत. म्युझियम उभारण्याचे काम अजून बाकी आहे. अन्य कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. नव्याने उभारलेले बोधचिन्ह ‘चिमणी वाचवा’ असा संदेश देत आहे. यात झाडांचा बुंधा आणि मुळे दाखविली आहेत. त्यावर घरट्यात चिमण्या दाखविण्यात आल्या आहेत.