एटीव्हीएमवरही मिळणार अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे
By Admin | Published: May 2, 2015 01:52 AM2015-05-02T01:52:53+5:302015-05-02T10:24:34+5:30
एटीव्हीएमवर लोकलसोबत आता अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटेही उपलब्ध करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
मुंबई : एटीव्हीएमवर लोकलसोबत आता अनारक्षित मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटेही उपलब्ध करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे अनारक्षित तिकिटे मिळविताना प्रवाशांचा वाया जाणारा बराचसा वेळ वाचणार आहे. पश्चिम रेल्वेच्या १३ स्थानकांवर असलेल्या एटीव्हीएमवर ही सुविधा दिली जाणार असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लोकलचे तिकीट पटकन मिळावे यासाठी रेल्वेतर्फे एटीव्हीएम बसविण्यात आली. आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर ४७५ एटीव्हीएम बसविण्यात आली आहेत. मेल-एक्स्प्रेस गाड्यांचीही तिकिटे उपलब्ध व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत होते. सध्या पश्चिम रेल्वेच्या १३ स्थानकांवरील २00 एटीव्हीएमवर ही तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चर्चगेट, दादर, अंधेरी, बोरीवली, भार्इंदर, वसई रोड, विरार, वैतरणा, सफाळे, पालघर, बोईसर, वानगांव, डहाणू रोड स्थानकात असलेल्या एटीव्हीएमवर ही तिकिटे मिळतील. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची अनारक्षित तिकिटे मिळविताना जाणारा प्रवाशांचा बराचसा वेळ वाचणार आहे.