युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:24 PM2022-06-09T12:24:50+5:302022-06-09T12:25:10+5:30
सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मुंबई : रोजगाराच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठीचा समावेश करण्याची भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची मागणी म्हणजे भाजपच्या अपयशाची कबुली आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे रोजगाराचा स्रोत म्हणून उत्तर प्रदेश हा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. त्याची कबुली सिंह यांच्या पत्राने दिल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात भाजपने स्वतःला उघडे तर पाडलेच पण उत्तर प्रदेशमधील स्वतःच्या सरकारची अक्षमता देखील उघड केली आहे. तर महाराष्ट्राने स्थलांतरितांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला होता. प्रत्यक्षात त्यांच्याच सरकारने वाईट वागणूक दिल्याचे जगाने पाहिले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
काय आहे पत्रात?
सिंग यांनी अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात वैकल्पिक विषय म्हणून मराठीचा समावेश करण्याची मागणी केली. मी महाराष्ट्रात ५० वर्षांपासून राहतो. रोजगाराच्या शोधात तरुण महाराष्ट्रात येतात. मात्र, मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांना अनेक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे युपीतील शालेय शिक्षणात मराठीचा पर्याय द्यावा. जेणेकरून इथल्या राज्य सरकार व महामंडळे, पालिकांमधील रोजगाराच्या संधी मिळू शकतील, अशी मागणी कृपाशंकर यांनी केली होती.