स्व-अध्ययनामुळेच यूपीएसीत मिळाले यश
By admin | Published: June 1, 2017 02:50 AM2017-06-01T02:50:50+5:302017-06-01T02:50:50+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी सलग तीन वर्षे अभ्यासात सातत्य आणि शिस्त ठेवली. आई-वडील यांच्याकडून
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी सलग तीन वर्षे अभ्यासात सातत्य आणि शिस्त ठेवली. आई-वडील यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आणि माझ्या परिश्रमामुळे आजचा आनंदाचा क्षण उजाडला आहे. यूजीपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्व-अध्ययनावर भर दिल्यास निश्चितच यश मिळेल, असे मत यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विश्वांजली गायकवाड हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विश्वांजली उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरजवळील तोरंबा या गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. परंतु, विश्वांजलीची आई ज्योती गायकवाड आणि वडील मुरलीधर गायकवाड हे दोघेही सध्या एमएमसीसी महाविद्यालयात शिक्षकपदावर कार्यरत आहेत. ज्योती गायकवाड या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका आहेत. विश्वांजलीने शालेय जीवनापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत एकदाही खासगी शिकवणी लावली नाही.
विश्वांजली म्हणाली, की आई-बाबांनीच मला या क्षेत्राची ओळख करून दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी मनलावून अभ्यास केला, पहिल्या प्रयत्नात मी कुठेच नव्हते. मात्र, खचून न जाता मी पुन्हा तयारीला लागले. शालेय जीवनापासून मी केवळ ‘सेल्फ स्टडीवर’भर दिला. यूपीएससीचा अभ्यासक्रम मुळात सेल्फ स्टडीवर आधारित आहे. स्वत: प्रत्येक विषय समजून घेतल्याशिवाय यूपीएससीला कोणताही पर्याय नाही. तसेच अभ्यास करताना प्रत्येकाने स्वत:मधील क्षमता आणि मर्यादांची माहिती घेतली पाहिजे. मी राज्यशास्त्र या विषयातील सर्व संकल्पना प्रथम समजून घेतल्या. तसेच इंटरनॅशनल रिलेशन या विषयासाठी खूप वाचन केले. दररोज वर्तमानपत्रांचे वाचन केले. केवळ वर्तमानपत्रातील माहितीवर अवलंबून न राहता. सखोल विचार करून त्यावर स्वत:चे मत तयार केले.
ज्योती गायकवाड म्हणाल्या, विश्वांजलीने नेहमी स्व-अध्ययनावर भर दिला. खेळात आणि अभ्यासातही तिला रस आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास हीच तिची अभ्यासाची पद्धत होती. त्यामुळे हा आनंदाचा दिवस दिसत आहे. मुरलीधर गायकवाड म्हणाले, ‘‘लहानपणापासून तिला आमचे मार्गदर्शन मिळाले. परंतु, तिच्या परिश्रमामुळेच आजचा दिवस उजाडला आहे.’’
यूपीएससीच्या मुलाखतीच्या वेळी प्रत्येकालाच ‘नर्व्हसनेस’ येतो. तसा मलाही आला होता. मात्र, तणावातून मुक्त होऊन मी मुलाखतीला सामोरे गेले. तुम्ही काय विचार करता? एखाद्या विषयाकडे कसे पाहता? तसेच स्वत:ला ओळखता का? हे पाहिले जाते. अभ्यासात माझ्या भावाचीही मला मदत झाली. रोर्इंग या खेळाचीही मला आवड आहे. आता परराष्ट्रसेवेत काम करण्याची मला इच्छा आहे.
- विश्वांजली गायकवाड
खेळातही आघाडीवर
विश्वांजलीचे शालेय शिक्षण पंडीतराव आगाशे शाळेत झाले. एमएमसीसीमध्ये विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर सीओईपीतून पदवी मिळवली. बारावीत ९६.३३ टक्के गुण मिळवणाऱ्या विश्वांजलीला राज्य मंडळाचे पारितोषिकही मिळाले होते. तसेच रोईंग या क्रीडाप्रकारात तिने राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला होता. आॅल इंडिया स्तरावरील स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले होते.
मूळचा पुण्याचा असलेल्या दिनेश गुरव (१६०) याने लिखाणावर सर्वाधिक भर दिल्याचे सांगितले़ तो म्हणाला, मुख्य परीक्षेसाठी अ
गोदरच्या टॉपरच्या पेपरचा अभ्यास केला़ पूर्वपरीक्षेसाठी मूळ पुस्तकांचा अभ्यास केला़ त्यानंतर पुन्हा मुख्य परीक्षेसाठी ३ महिने दिले़ पॉलिटिकल सायन्ससाठी युनिक अॅकॅडमी तर अन्य विषयासाठी चाणक्यचे क्लास लावला होता़ दिल्लीतील क्लासेसने घेतलेल्या मॉक इंटरव्ह्युचा चांगला फायदा झाला़ लक्ष्यच्या महेश भागवत सरांचा मुलाखतीसाठी मदत झाली़ महाराष्ट्र कॅडेटसाठी माझे प्राधान्य असेल़
मूळचे उस्मानाबादचे असणारे रामराजे माळी (८८८) हे एमबीबीएस डॉक्टर असून चौथ्या प्रयत्नात ते ही परीक्षा पास झाले आहेत़ याअगोदर त्यांनी २०१५ मध्ये मुंबई आणि २०१६ मध्ये यशदामधून अभ्यास केला होता़ त्याने वाचन, लिखाणावर प्रामुख्याने भर दिला असून मेडिकलची इंटरशिप झाल्यानंतर त्यांनी २०१४ पासून पूर्ण वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते़ त्यांच्या घरी आई-वडील, मोठा भाऊ व २ बहिणी आहेत़ घरात प्रथमच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेले ते पहिलेच आहेत़
मूळचा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील शुभम ठाकरे (६८६) याने इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मध्ये सीओयूपीमधून बी़ टेक. केले आहे़ २०१४ मध्ये प्रथम परीक्षा दिली होती़ २०१५ मध्ये त्याची आयआरएस कस्टममध्ये निवड झाली़ तेथे रुजू झाल्यानंतर त्याने रजा घेऊन अभ्यास केला़ पुण्यात एक वर्ष क्लासमध्ये अभ्यास केला़ त्याच्या घरी आई-वडील, २ भाऊ असून एक भाऊ एमबीबीएस आहे़ वाचन आणि लिखाणावर भर दिला.