आगामी महापौर शिवसेनेचाच- आदित्य ठाकरे

By Admin | Published: December 27, 2016 10:13 PM2016-12-27T22:13:52+5:302016-12-27T22:13:52+5:30

शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असे जणू समीकरण झाले

Upcoming Mayor Shiv Sena's - Aditya Thakre | आगामी महापौर शिवसेनेचाच- आदित्य ठाकरे

आगामी महापौर शिवसेनेचाच- आदित्य ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. 27 - शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असे जणू समीकरण झाले असून मुंबईकर शिवसेनेची साथ कधी सोडत नाही. गेल्या ५ वर्षात शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवकांनी केलेल्या अगणित विकासकामांच्या जोरावर मुंबईकरांनी आम्हाला परीक्षेत पास केले आहे. आपली अभेद्य एकजूट कायम ठेवून पालिकेवर भगवा फडकवून आगामी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असेल, असे ठाम प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सायंकाळी दिंडोशी येथे केले. आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशीत अगणित कामे केली असून, येथील नागरिकांनी शिवसेनेला विकासकामांच्या परीक्षेत पास केले आहे.त्यामुळे येथे झालेल्या प्रभाग क्र. ४० आणि ४१मध्ये शिवसेनेचा नगरसेवक येथील नागरिक निश्चित निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेविका मनीषा पाटील यांच्या गेल्या दोन वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

गोरेगाव(पूर्व) नागरी निवारा क्रमांक २ येथील म्हाडा सर्कलसमोर खासदार गजानन कीर्तिकर आणि आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनातून येथील प्रभाग क्र. ३७च्या शिवसेना नगरसेविका मनीषा पाटील यांच्या नगरसेवक फंडातून सुमारे ६१६४.५ चौफूट जागेत मोठे लाल मातीचे क्रीडांगण असे आदित्य यांच्या संकल्पनेतील हे मुंबईतील पहिले उद्यान आहे आणि बाजूला जॉगिंग ट्रॅक, आधुनिक खेळाचे साहित्य आणि त्याखाली रबर मॅट,बास्केट बाॅल कोर्ट, भक्कम प्रवेशद्वार, शोभिवंत फुलझाडे आणि हिरवळ, विद्युत रोषणाई, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, शौचालयाची सुविधा, स्केटिंग, ओपन जिम असे सर्व सुविधायुक्त उद्यान हे दिंडोशीकरांना नववर्षाची भेट शिवसेनेने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी येथील क्रीडांगणालगत नागरी निवारा पोलीस बीट चौकीचे उद्घाटन दिंडोशीचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते झाले.

या लोकार्पण सोहळ्यास मुंबईच्या स्नेहल आंबेकर, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे, महिला विभागसंघटक साधना माने,आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, स्थापत्य समिती अध्यक्ष अनंत(बाळा)नर, स्थानिक नगरसेविका मनीषा पाटील, माजी नगरसेवक सदाशिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेनेने गेल्या ५ वर्षात मुंबईमध्ये ५१९ उद्याने व क्रीडांगणे उभारली असून या वर्षात ७७-७८ उद्याने,११८ पालिका शाळांची दुरुस्ती,४८० व्हर्च्युअल क्लासरूम, इयत्ता ८, ९वीच्या विद्यार्थ्यांना टॅब अशी अनेक विकासाची कामे केली असून, पुढच्या वर्षीपासून प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देणार आहेत. फिफा फुटबॉल येथील खेळाडूनां फुटबॉलचे धडे देणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, ३६५ दिवस कार्यरत असणारा पक्ष शिवसेना आहे. एकीकडे मुंबईकरांना मूलभूत सुविधा पुरवत असताना अनेक सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक सुविधा पुरवत असताना उद्यान आणि क्रीडांगण सारखे स्पेशल व सुपर स्पेशल सुविधा शिवसेना पुरवत आहे. शिवसेना निवडणुकीपुरती कामे करत नसून सतत ५ वर्षे मुंबईत अगणित विकासाची कामे करत असल्याची माहिती त्यांनी दिली. विकासकामांचा जोगवा आम्ही घेऊन शिवसेना निवडणुकीला यशस्वीपणे सामोरे जाणार असून, पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी आपल्या प्रस्ताविक भाषणात माजी नगरसेवक सदाशिव पाटील म्हणाले की, येथील म्हाडाच्या ताब्यात असलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी आमदार प्रभू व मी पाठपुरावा केला आणि चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर खासदार कीर्तिकर यांच्या प्रेरणेने येथे सुसज्ज क्रीडांगण आणि उद्यान आणि बाजूला पोलीस चौकी उभी राहिली. या भागात खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी रस्ते आणि अनेक सुविधा मिळवून दिल्या. त्यामुळे येथील ४० व ४१ प्रभागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील असा असे ठोस आश्वासन आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

पी(उत्तर)विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त संगीता हसनाळे, सायली सुनील प्रभू, दिंडोशी विधानसभा निरीक्षक अनघा साळकर, उपविभागप्रमुख अँड.सुहास वाडकर व विष्णू सावंत, महिला उपविभाग संघटक पूजा चौहान व रिना सुर्वे, युवा सेना निरीक्षक अंकित प्रभू व रुपेश कदम, स्थानिक शाखाप्रमुख संदीप जाधव, महिला शाखासंघटक वैभवी पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेनेचे विजय गावडे यांनी केले. यावेळी येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Upcoming Mayor Shiv Sena's - Aditya Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.