सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करणार
By admin | Published: July 5, 2017 05:11 AM2017-07-05T05:11:24+5:302017-07-05T05:11:24+5:30
राज्य पोलीस दलाचे मुख्यालय असलेल्या पोलीस महासंचालक कार्यालयातील कित्येक वर्षांपूर्वीच्या अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी
जमीर काझी/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य पोलीस दलाचे मुख्यालय असलेल्या पोलीस महासंचालक कार्यालयातील कित्येक वर्षांपूर्वीच्या अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या यादीच्या संकलनापासून या कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे.
राजीनामा दिलेल्या आणि निवृत्त झालेल्या २५०वर अधिकाऱ्यांची नावे निरीक्षकासाठीच्या पदोन्नतीसाठी गृहीत धरलेल्या यादीत होती. ‘लोकमत’ने सोमवारी त्याबाबतचे वृत्त दिले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी त्याची दखल घेतली आहे. सर्व पोलीस घटकातून त्वरित माहिती मागवून ती ‘अपडेट’ करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. येत्या महिन्याअखेरपर्यंत ७००वर अधिकाऱ्यांची बढती केली जाईल.
पोलीस दलातील निरीक्षक पदाच्या रिक्त असलेल्या ७६३ पदांसाठी पात्र अधिकाऱ्यांना येत्या पंधरवड्यात पदोन्नती दिली जाणार आहे. त्यासाठी मुख्यालयातील आस्थापना विभागाने पदोन्नतीसाठी विचाराधिन असलेल्या १५५१ अधिकाऱ्यांची नावे नुकतीच जाहीर केली आहेत. मात्र त्यामध्ये दहा वर्षांपूर्वी खात्याचा राजीनामा दिलेला ख्वाजा युनूस हत्येप्रकरणातील वादग्रस्त एपीआय सचिन वाझे याच्यासह सेवानिवृत्त, निलंबित व काही मृत झालेल्या अधिकाऱ्यांच्याही नावांचा समावेश आहे. याबाबत संबंधित पोलीस घटकांकडून त्या त्या वेळी मुख्यालयाकडे माहिती पाठवूनही ती ‘अपडेट’ करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला होता. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली. त्यानंतर महासंचालक माथूर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले. कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती ‘अपडेट’ ठेवण्याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या एकाही अधिकाऱ्यावर अन्याय होता कामा नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले.
अन्याय होणार नाही
सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयात काही याचिका प्रलंबित होत्या. त्यामुळे २०१४पासून अधिकाऱ्यांची यादी ‘अपडेट’ करण्यात आलेली नव्हती. आता त्याचे काम सुरू असून, सर्व घटकप्रमुखांना त्याबाबत त्वरित माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. पदोन्नतीला पात्र असणाऱ्या एकालाही डावलू दिले जाणार नाही. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.
- राजेंद्रसिंह, अपर महासंचालक, आस्थापना