‘यूपीआय’ अपहार; दोन सूत्रधारांना अटक
By Admin | Published: March 17, 2017 03:35 AM2017-03-17T03:35:57+5:302017-03-17T03:35:57+5:30
महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून यूपीआय अॅपद्वारे पैसे काढून ६ कोटी १४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी औरंगाबाद येथील आनंद लाहोटी आणि किरण
पुणे : महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून यूपीआय अॅपद्वारे पैसे काढून ६ कोटी १४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी औरंगाबाद येथील आनंद लाहोटी आणि किरण गावडे या दोघांना पकडण्यात पुणे शहर पोलीस दलाच्या सायबर सेलला यश आले आहे़ या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे़
याप्रकरणी पोलिसांनी याआधी अशोक बबनराव हांडे (४९, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), दिनेश सयाजी मोढवे (४१, रा. मढ, ता. जुन्नर), संतोष प्रकाश शेवाळे (३७, रा. शिक्रापूर, ता. शिरुर), राजेश काबरा व पंकज पिसे या पाच जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीत लाहोटी आणि गावडे यांची नावे समोर आली. अधिक तपासात पोलिसांना बुलडाणा, नाशिक, वाशिम येथील त्यांच्या अन्य ९ साथीदारांची नावेही मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्र बँकेतील खात्यांमधून यूपीआय अॅपद्वारे खात्यात पैसे नसतानाही पैस काढून त्याचा अपहार करण्याच्या प्रकरणाची सुरुवात औरंगाबाद येथून झाली होती़ त्याचा मुख्य सूत्रधार आनंद लाहोटी आहे़ त्याने किरण गावडे याच्या सहाय्याने राजेश काबरा, पंकज पिसे यांच्यामार्फत लोकांकडील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांचे सीमकार्ड मिळवून त्याद्वारे कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे़
तर, अशोक हांडे, दिनेश मोढवे व संतोष शेवाळे या तिघांच्या बँक खात्यांची माहिती घेतली असता प्रत्येकाच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)