अप्पर कोपर स्थानक म्हणजे गैरसोयींचा अड्डा

By admin | Published: July 10, 2017 04:09 AM2017-07-10T04:09:05+5:302017-07-10T04:09:05+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई व विरारकडे जाण्यासाठी जसा दादर स्थानकाचा वापर केला जायचा

Upper Copper station is the inconvenience | अप्पर कोपर स्थानक म्हणजे गैरसोयींचा अड्डा

अप्पर कोपर स्थानक म्हणजे गैरसोयींचा अड्डा

Next

पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई व विरारकडे जाण्यासाठी जसा दादर स्थानकाचा वापर केला जायचा, तसे हार्बर रेल्वे मार्गावर पनवेलला जाण्यासाठी कुर्ला स्थानक गाठावे लागायचे. नंतर ठाणे मार्गे सोय झाली. पण निळजे, तळोजा, नावडे, कळंबोली या भागासह पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अप्पर कोपर स्थानकाशिवाय पर्याय नाही. ३० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या स्थानकाचे सध्याचे चित्र तसेच आहे. अनेक गैरसोयींचा सामना करतच येथील प्रवाशांना प्रवास करावा लागतो. या स्थानकाची लांबी वाढली, पण पूर्ण स्थानकावर साधी शेड नाही. त्यामुळे गाडीच्या पहिल्या पाच डब्यातील प्रवाशांना रखरखत्या उन्हात आणि पाऊस अंगावर झेलत गाडीची वाट पाहण्यासाठी ताटकळत उभे रहावे लागते. तिकीटघराजवळील अपवाद वगळता येथील दोन्ही स्थानकांवर गाडयांचे वेळापत्रक दर्शविणारे इंडिकेटर्स नाहीत. तसेच गाडीचा कोणता डबा कुठे येतो याबाबतचे फलकही नाहीत. त्यामुळे महिला, प्रथम वर्गाचे प्रवासी, सामान नेणाऱ्यांची कोंडी-धावपळ होते.
येथील फलाट सिमेंटचे आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी सिमेंट उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडून पावसात पाण्याची डबकी साचतात. फलाटावर येण्यासाठी तीन प्रवेशद्वार असतानाही ती योग्य पद्धतीने न जोडल्याने प्रवाशांना रेल्वेमार्गावरून जीव धोक्यात घालून आडवाटेने फलाट गाठावा लागतो. यात तिकिट तपासनिसांंची तारांबळ उडते. प्रसंगी प्रवासी आणि त्यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. अप्पर स्थानकात दोन फलाट जरी असले तरी एकाच फलाटावर तेही वसईच्या दिशेला एकच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. तसेच तळातील फलाटावरही दिव्याच्या दिशेला एक स्वच्छतागृह आहे. तेही अस्वच्छ आहे. बंद, अंधाऱ्या स्थितीत. त्यामुळे कोपर स्थानकावर येणारा प्रवासी तिथपर्यंत जाण्याचा त्रास न घेता उघड्यावरच लघुशंका उरकतो. मात्र महिला प्रवाशांची कुचंबणा होते. फलाटावर तीन पाणपोया आहेत. पण त्यांना नळ नाहीत. पाच रूपयांत स्वच्छ पाण्याची सोय नाही. त्या पाणपोया निरूपयोगी आहेत. येथील गाड्यांत विकले जाणारे स्वच्छ पाणी अनोळखी ब्रँडचे असल्याने ती कंपनी खरेच अस्तित्त्वात आहे की नाही, याबद्दल शंका येते. पाणपोयांचा परिसर अस्वच्छ असल्याने रोगराईला निमंत्रण मिळते. दिव्यांची संख्याही मर्यादित. पंखे वाढले पण तेही मोजक्याच भागात. त्यामुळे त्यांचा लाभही ठराविक प्रवाशांनाच होतो.
मेमू गाड्यांंऐवजी लोकल सोडाव्या, अशी मागणी येथील प्रवाशांकडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. पण स्थानिक अधिकारी फक्त वरिष्ठ पातळीवर या मागण्या कळवण्याचे काम करतात. परिस्थितीचा अहवाल पाठवत नाहीत. त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ राहते. या मार्गावर ‘मेमू’शिवाय अन्य पर्याय नसल्याने गाड्यांना प्रचंड गर्दी होते. दोन गाड्यांमधील अंतर दोन ते तीन तासाचे असल्याने फलाटावर गाडी येण्याच्या वेळेस झुंबड उडते. गाडी पकडण्यासाठी प्रवासी उलट्या बाजूनेही चढतात. गाडीच्या गर्दीमुळे मोठ्या आणि छोट्या दरवाजातून प्रवाशांचा लोंढा बाहेर पडतो आणि तेवढेच आत शिरतात. असा जीवघेणा प्रवास किती दिवस करायचा? असा प्रवाशांचा सवाल आहे.
फलाटाच्या बाजूकडील संरक्षक जाळ््याही तुटल्या असून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी बांधलेल्या पुलावर भिकारी, गर्दुल्ले आणि भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. त्यातून अस्वच्छता-दुर्गंधी पसरलेली असते.
दर्जा दिला, सुविधा कुठे?
‘गेल्या अनेक वर्षापासून प्रवासी संघटना या मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करत आहे. त्यानुसार या मार्गाला उपनगरी दर्जा दिला, मात्र कसारा ते सीएसटी तसेच कर्जत-सीएसटी मार्गावर प्रवाशांना ज्या सुविधा मिळतात त्या आजवर मिळालेल्या नाहीत. उलट उपनगरीचा दर्जा दिल्यानंतर तिकिटाचे दर वाढवले, यालाही पाच ते सहा वर्षे झाली, पण दर्जा मिळालेला नाही. दर वाढवण्यासाठीच उपनगरीचा दर्जा दिला का? आमचा पाठपुरावा सुरू असतोच; पण खासदारांमार्फत पाठपुराव्याची प्रक्रिया पुढे सुरू राहणे आवश्यक आहे. याला मिळणाऱ्या प्रतिसादाची माहिती कळणे आवश्यक आहे. आजच्याघडीला दिवा रेल्वे स्थानकांसह वसई मार्गावरील सर्वच स्थानकातील फलाटांवर पुरेशा शेड नाहीत. याचबरोबर गाडयांच्या फेऱ्याही वाढल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.
- अ‍ॅड आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना.
लोकल चालवणे सहज शक्य, पण इच्छाशक्तीचा अभाव
‘पश्चिम रेल्वेच्या वसईपासून मध्य रेल्वेच्या दिवा, पुढे पनवेलपर्यंतसुध्दा लोकल चालवणे या दुहेरी मार्गावर सहज शक्य आहे. याच मार्गावरून मध्य रेल्वेच्या उत्तरेकडून किंवा कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्याही जातात. तसेच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. पण प्रवासी वाहतुकीसाठी या मार्गावर फारच तुरळक प्रमाणात तब्बल दोन ते तीन तासांच्या फरकाने शटल सेवा चालवली जाते. रेल्वे प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावात लोकलसेवेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळात या मार्गावर रेल्वे धावली; परंतु ती शटल सेवेच्या स्वरूपात कायम राहिली. रेल्वेचे अधिकारी पुरेशा गाड्या नाहीत, मनुष्यबळ नाही असे तुणतुणे नेहमीच वाजवते. परंतु विद्यमान रेल्वेमंत्री आणि खासदारांनी लोकलच्या मागणीचा गांभीर्याने विचार केल्यास हा प्रश्न निकाली निघू शकतो. केवळ फुटकळ मागणी नको, तर प्रभावीपणे पाठपुरावा केला पाहिजे’’
- यशवंत जोगदेव, रेल्वेचे अभ्यासक आणि सल्लागार सकारात्मक
भूमिकेतून
उत्पन्न वाढेल
‘आजच्याघडीला मोठ्या प्रमाणावर प्रवासी दिवा-कोपर-वसई मार्गावरून प्रवास करतो. भिवंडीतील हातमाग, पॉवरलूममधील बरेच कामगार कोपरहून प्रवास करतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिलेल्या उद्योगव्यवसायात तसेच येथील गोदामांमध्ये मुंबई, पनवेल, कर्जत, डहाणू परिसरातून येणारा कामगार प्रवासीही आहे. रोज सुमारे आठ हजाराहून अधिक प्रवासी संख्या असताना त्यामानाने सुविधा नाहीत. कल्याण-डहाणू रेल्वेसेवेचाही विचार होणे आवश्यक आहे. उपनगरी सेवेचा दर्जा दिला असला, तरी तशा सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. जर रेल्वेने सुविधांच्या माध्यमातून तसेच लोकलसेवा सुरू करून फेऱ्यांची संख्या वाढविली; तर रेल्वेचे उत्पन्न वाढेल. मालगाडी आणि लांबपल्ल्यांच्या गाडयांची मार्गावरील वाढती संख्या लक्षात घेता लोकल चालू करायला प्रशासनाची आडकाठी का? लवकरात लवकर प्रशासनाने सकारात्मक विचार करून प्रवाशांना सुविधा द्याव्यात जेणेकरून प्रवास सोयीस्कर होईल.
- गिरीश त्रिवेदी, प्रवासी.
१२ डब्यांची लोकल सोडा
या मार्गावरून मध्य रेल्वेच्या जुन्या झालेल्या बारा डब्यांच्या लोकल सोडल्या तरी प्रवाशांची सोय होईल.
दिवसभरात अवघ्या सात-आठ फेऱ्यांपेक्षा अधिक फेऱ्या होतील. सध्या मेमू गाड्या प्रत्येक स्थानकात तीन ते पाच मिनिटे थांबतात. तो वेळ कमी होईल.
त्यामुळे कोपर-वसई हा प्रवास ४० ऐवजी ३० मिनिटांतच पूर्ण होईल. जुन्या लोकलचाही वापर होईल आणि रेल्वेने उपनगरी दर्जा देऊन तिकीटवाढ केली असल्याने तो उपनगरी मार्ग प्रत्यक्षात येईल.
तिकीटघर नव्हे, कोंडवाडा : कोपरला पुलावर असलेले तिकीटघर हा जणू कोंडवाडा बनला आहे. तेथील ईव्हीएम मशीन अनेकदा बंद असतात. तिकीट खिडक्याही पुरेशा नाहीत. चार खिडक्या आहेत. त्यातील एकच, कमी वेळा दोन खिडक्या सुरू असतात. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी असेल आणि तिकिटे देता आली नाही, तर गाडी थांबवून ठेवण्याची वेळ येते. सकाळी सव्वादहाच्या गाडीच्या वेळेस तर तिकीट घराच्या सर्व बाजूंनी प्रवाशांची गर्दी होते. एखादी गाडी आली तर तिकीट घर ओलांडूनच खालच्या कोपर स्थानकात जावे लागत असल्याने अक्षरश: चेंगराचेंगरी होते.
नायगावच्या वळणाचा वापर
दिवा-वसई मार्गावरून पूर्वी गाड्या फक्त विरार, डहाणू, गुजरातच्या दिशेने जात होत्या. पण जूचंद्र स्थानकानंतर नायगावच्या दिशेने वळण बांधण्याचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतल्याने भविष्यात दिवा, पनवेलहून येणाऱ्या गाड्या थेट नायगाववरून बोरिवली, अंधेरीला जाऊ शकतील. त्यामुळे त्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, पैसे वाचतील. त्यांना वसईत उतरून पुन्हा दुसरी गाडी पकडावी लागणार नाही. कोकण रेल्वे, गोवा, दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांची जशी यातून सोय होईल, तशीच बोरिवलीपर्यंतच्या लोकल प्रवाशांचीही सोय होईल.
गाड्यांतील सूचनाही गुजरातीत
या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या मेमू गाड्या गुजरात मार्गावरील असल्याने त्यातील स्वच्छतेपासून, रोगराईला आळा घालण्यापर्यंतचे सर्व संदेश, पत्रके ही गुजरातीत असतात. वस्तुत: त्या मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांत चिकटवणे शक्य आहे. पण राजकीय पक्षांनी कधी या मार्गाकडे लक्षच न दिल्याने दिवा-वसई, डहाणू, पनवेलचे प्रवासी सर्व सूचना सक्तीने गुजरातीतच वाचतात.
सुविधा देण्यास विलंब का?
अनेक वर्षापासून दिवा-वसई मार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. आता दर्जा मिळाला असतानाही त्याप्रमाणे सुविधा देण्यास विलंब का? रेल्वेमंत्र्यांनी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी तातडीने पूर्ण केली पाहिजे.
- आनंद परांजपे,
माजी खासदार.

Web Title: Upper Copper station is the inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.