अप्पर तुडीलमध्ये पाणीटंचाई
By Admin | Published: June 27, 2016 02:09 AM2016-06-27T02:09:41+5:302016-06-27T02:09:41+5:30
गेला आठवडाभरापासून महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
दासगांव : गेला आठवडाभरापासून महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. आजही महिलावर्ग पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत.
महाड तालुक्यातील खाडी पट्टा विभागातील अप्पर तुडील या गावामध्ये आजही भीषण पाणीटंचाई असून मात्र या गावातील अनेक तरुणवर्ग आपल्या स्वखर्चाने वाड्यांवर मोफत पाणी पोहोचवण्याचे काम करत आहेत. याच गावचे नागरिक आज जिल्हा परिषद सदस्य असून पाणी समस्या दूर न करू शकल्याने नागरिकांकडून यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पाण्याची झळ बसलेल्या जवळपास १०० मुस्लीम महिलांनी ग्रामसभेत हजेरी त्यांनी आपली व्यथा यावेळी मांडली. आतापर्यंतच्या इतिहासात ग्रामसभेत पहिलीच मुस्लीम महिलांची एवढ्या मोठ्या संख्येत हजेरी आहे. अप्पर तुडील या गावाची स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहे. ही योजना गावाशेजारी असणाऱ्या विहिरीवरून घेण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीपर्यंत या योजनेमधून अप्पर तुडीलमध्ये पाणी मुबलक मिळत होते. यंदा विहीर आटल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच या गावाला पाणीटंचाईची झळ बसली. या नळपाणी पुरवठा योजनेवर आंबेवाडी, चाळणीकोंड, कातळकोंड, अप्पर तुडील मोहल्ला अशा जवळपास ४ हजार लोकसंख्येच्या असलेल्या वाड्या अवलंबून आहेत.
अचानक मे महिन्यातच पाणी गेल्याने या ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. हे पाहता या गावचे समाजसेवक रिहान फैरोज खान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युसूफ देशमुख, नदीम खान देशमुख, नदीम खानदेशी, अब्दुल्ला कझी यांनी गावाला पाणीपुरवठा करण्याचा एकमताने निर्णय घेत, गेल्या दीड महिना झाला तरी अप्पर तुडीलमधील ४ हजार लोकसंख्येला अहोरात्र पाणीपुरवठा करत आहेत.
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी चार गाड्यांचा वापर केला असून एक पिकअप जीप, दोन ४0७ तर एक ७०९ अशा गाड्यांमधून जवळपास सहा हजार लिटर पाणी मोफत वाडी वाडीवर हे नागरिक स्वत: वाटप करत आहेत. मात्र लागणारे पाणी हे रिहान देशमुख यांनी स्वत:च्या घरी असलेल्या बोअरवेलमधून देत आहेत. गाड्यांमध्ये लागणाऱ्या डिझेलला हेच नागरिक आपल्या खिशातून पैसा टाकत आहेत. मात्र याच गावचे नागरिक इब्राहिम झमाने हे जिल्हा परिषद सदस्य असून यांनी या भीषण पाणीटंचाईसंदर्भात कोणतेच पाऊल न उचलल्याने मात्र येथील नागरिकांकडून यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
>पाणीटंचाईची महिलांना झळ
अप्पर तुडील या गावामध्ये यंदा पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात महिलावर्गाला बसली असून मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिलांना याचा त्रास झाला आहे. त्यामुळे अप्पर तुडीलच्या इतिहासात पहिलीच ग्रामसभा गुरुवारी झाली. यावेळी जवळपास १०० मुस्लीम महिलांनी पाणीप्रश्न दूर करण्यासाठी या ग्रामसभेला हजेरी लावत जुना गैरहजेरीचा इतिहास मोडला. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत महाड तालुक्यात ३२६ मिमी पावसाची नोंद आहे. मात्र एवढा पाऊस लागून देखील अनेक गावांची पाणीटंचाई समस्या दूर झालेली नाही. अप्पर तुडील या गावात पाण्यासाठी नागरिकांनी केलेली मदत कौतुकास्पद असून परिसरात खाडी पट्टा विभागात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.