सोलापुरातील विडी उद्योगावर गंडांतर; पाच वर्षांत पंधरा हजार कामगारांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:19 PM2019-12-18T13:19:34+5:302019-12-18T13:21:12+5:30

शासकीय धोरणांचा बसला फटका; तीस टक्के उत्पादन घटले; महिला कामगार वळताहेत इतर उद्योगांकडे

Uprising on the video industry in Solapur; Fifteen thousand workers cut in five years | सोलापुरातील विडी उद्योगावर गंडांतर; पाच वर्षांत पंधरा हजार कामगारांची कपात

सोलापुरातील विडी उद्योगावर गंडांतर; पाच वर्षांत पंधरा हजार कामगारांची कपात

googlenewsNext
ठळक मुद्देविडी उद्योगावर गंडांतर आल्याने राज्यभरातील ३५ हून अधिक मोठ्या विडी कंपन्यांच्या भविष्यावर टांगती तलवार चार वर्षांपूर्वी विडी बंडलच्या पाकिटावर धोकादायक सचित्र लावण्याची सक्ती करण्यात आलीसचित्र लावण्यास विडी उत्पादकांचा विरोध नाही़ त्याचे प्रमाण कमी असावे, अशी आमची अपेक्षा आहे

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर :  शासकीय धोरण तसेच जीएसटीमुळे सोलापूरसह राज्यातील विडी उद्योगावर सध्या मोठे गंडांतर आलेले आहे़ मागील काही वर्षांत जवळपास ३० टक्के विड्यांच्या उत्पादनात घट झाली आहे.

शेती, टेक्स्टाईलनंतर सर्वाधिक महसूल विडी उद्योगातून शासनाला मिळतो़ राज्यभरातील दोन लाख कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत़ एकट्या सोलापुरात मागील पाच वर्षांत पंधरा हजारांहून अधिक विडी कामगारांची कपात झाल्याची माहिती समोर आली आहे़ राज्यात विविध ठिकाणीही अशीच स्थिती आहे.

विडी उद्योगावर गंडांतर आल्याने राज्यभरातील ३५ हून अधिक मोठ्या विडी कंपन्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे.
अधिक माहिती देताना विडी उत्पादक संघाचे सचिव सुनील क्षेत्रीय यांनी सांगितले, जवळपास चार वर्षांपूर्वी विडी बंडलच्या पाकिटावर धोकादायक सचित्र लावण्याची सक्ती करण्यात आली़ विडी बंडलच्या ८५ टक्के पृष्ठभागावर सचित्र लावण्याची सक्ती झाली़ पूर्वी या सचित्राचे प्रमाण कमी होते़ ८५ टक्केची सक्ती झाल्यानंतर विडी मागणीवर परिणाम झाला.

सचित्र लावण्यास विडी उत्पादकांचा विरोध नाही़ त्याचे प्रमाण कमी असावे, अशी आमची अपेक्षा आहे़ तसेच विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी लावल्यामुळे याचा एक अप्रत्यक्ष भार उत्पादनावर पडला़ पर्यायाने विड्यांच्या किमतीतही दुपटीने वाढ झाली़ परराज्यातून येणारी मागणी कमी झाली़ सोलापुरात तयार होणाºया विड्यांना देशभरातून मागणी होती़ आता ही स्थिती राहिलेली नाही़ मागील काही वर्षांत ३० टक्क्यांनी उत्पादन कमी झालेले आहे़  त्यामुळे पर्यायाने कामगारांची कपात आपोआप झाली़ दोन वर्षांपासून आम्ही नवीन कामगार भरती बंद केली नाही़ त्यामुळे या उद्योगाकडे शासनाला गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

दररोज साडेतीन कोटी विड्या...
- सोलापुरात रोज साडेतीन कोटी विड्या तयार होतात़ यातून रोज कोट्यवधीची उलाढाल होते़ पूर्वी या क्षेत्रात ५५ हजारांहून अधिक विडी महिला कामगार कार्यरत होत्या़ आता ही संख्या ४० हजारांवर आलेली आहे़ भविष्यात या संख्येत आणखी घट होण्याची दाट शक्यता आहे़ आम्ही शासनासमोर आमच्या अडचणी मांडल्या़ विडी उद्योगाकडे शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही़ त्यामुळे नित्यनवे नियम या उद्योगावर येत आहेत़ याचा फटका आम्हाला बसतोय़ या उद्योगावर लाखो कामगार अवलंबून आहेत़ कोट्यवधीचा महसूल आम्ही शासनाकडे नियमित भरतो़ आता या उद्योगाला वाचविण्याची वेळ आलेली आहे़ अन्यथा विडी उद्योग कोलमडून पडेल आणि लाखो विडी कामगार बेरोजगार होतील, अशी खंत सुनील क्षेत्रीय यांनी व्यक्त केली़

Web Title: Uprising on the video industry in Solapur; Fifteen thousand workers cut in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.