विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी, सत्तारूढ अन् विरोधी आमदार आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:27 AM2023-03-25T05:27:41+5:302023-03-25T05:28:10+5:30

तणावाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.

Uproar again in the Assembly; The proceedings were adjourned three times, loud sloganeering, ruling and opposition MLAs faced each other | विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी, सत्तारूढ अन् विरोधी आमदार आमनेसामने

विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी, सत्तारूढ अन् विरोधी आमदार आमनेसामने

googlenewsNext

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या विधान भवनच्या पायऱ्यांवरील घटनेवरून शुक्रवारी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंचे सदस्य आमनेसामने आले. तणावाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरील घटनेत असलेल्या आमदारांवर कारवाईची मागणी केली. पीठासीन अधिकारी असलेले एक सदस्य ही त्या घटनेत होते. अहवाल मागवू मग निर्णय घेऊ असे अध्यक्षांनी म्हटले असले तरी कारवाई तत्काळ झाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यावर संतप्त झालेले भाजपचे आशिष शेलार यांनी पंतप्रधानांविरुद्ध वाटेल तशा घोषणा देणे, मुख्यमंत्र्यांविरुद्ध खोके वगैरे वाटेल तसे बोललेले चालते का, कारवाई करायचीच तर अशा आमदारांविरुद्ध ही झाली पाहिजे, असा जोरदार प्रति हल्ला केला आणि गदारोळाला सुरुवात झाली.

सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदारही वेलमध्ये उतरले. विरोधी बाकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तर सत्तापक्षाकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी दोन्ही बाजूचे काही आमदार हमरीतुमरीवर ही आल्याने सभागृहात तणावाचे वातावरण होते. प्रचंड गदारोळात कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.

सावरकर, मोदींचा अपमान कराल तर... - मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावले
आम्ही बोलत नाही याचा अर्थ बोलू शकत नाही, असे समजू नका. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोललात तर ते सहन केले जाणार नाही, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांना ठणकावले. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधान भवनच्या पायऱ्यांवर जोडे मारण्यावरून सभागृहात शुक्रवारी झालेल्या गदारोळ नंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जोडे मारण्याच्या घटनेचे समर्थन करता येणार नाही. पण आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हा देशाचा अपमान आहे. गेली आठ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून त्यांना गद्दार म्हणणे, खोके म्हणणे, मिंधे म्हणणे हे कोणत्या आचारसंहितेत बसते? सावरकरांचा वारंवार अपमान करणे, हे देखील देशद्रोहाचे काम आहे. देशाची कीर्ती जगभरात पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 
देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता कधीच सहन करणार नाही. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. सर्वांना तारतम्य बाळगले पाहिजे, या सदनाचा मान राखणे गरजचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Uproar again in the Assembly; The proceedings were adjourned three times, loud sloganeering, ruling and opposition MLAs faced each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.