पूजा खेडकरांविरोधात मोठी कारवाई! UPSCने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 03:07 PM2024-07-19T15:07:29+5:302024-07-19T15:32:02+5:30

प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

UPSC filed FIR against trainee IAS Pooja Khedkar notice issued | पूजा खेडकरांविरोधात मोठी कारवाई! UPSCने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

पूजा खेडकरांविरोधात मोठी कारवाई! UPSCने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

IAS Pooja Khedkar  : महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची चर्चा आहे. यासोबत पूजा यांचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली. दुसरीकडे आता पूजा खेडकरांवर देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच युपीएससीने खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील युपीएससीने  खेडकरांकडे केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर ओबीसी कोट्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय सेवेत रुजू झाल्यानंतर त्या चुकीच्या मागण्या करू लागल्या होत्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांची फाईल उघडली असता एकामागून एक त्रुटी आढळून आल्या.

युपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे. यासोबत पूजा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रे निर्माण करून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली, जे नियमांच्या विरोधात असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिणार्थी असताना देखील त्यांनी खासगी आलिशान ऑडीला अंबर दिवा लावला. गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन,घेतले, तसेच शिपाईही घेतले होते. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. त्यानंतर खेडकर यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

Web Title: UPSC filed FIR against trainee IAS Pooja Khedkar notice issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.