व़डील चहा विकायचे, आई विडी कामगार तरी पठ्ठ्याने फडकाविला यूपीएससीत झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:37 AM2023-05-24T06:37:43+5:302023-05-24T06:38:05+5:30

UPSC Result: मालवण, वेंगुर्ल्याचे दोघे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुले काही कमी नाहीत, हेच या सर्वांनी दाखवून दिले.

UPSC Result: Father used to sell tea, mother was a laborer but hoisted the flag in UPSC Mangesh Khilari | व़डील चहा विकायचे, आई विडी कामगार तरी पठ्ठ्याने फडकाविला यूपीएससीत झेंडा

व़डील चहा विकायचे, आई विडी कामगार तरी पठ्ठ्याने फडकाविला यूपीएससीत झेंडा

googlenewsNext

- शेखर पानसरे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
संगमनेर (जि. अहमदनगर) : वडिलांचे छोटेसे हॉटेल आणि आई विडी कामगार असलेल्या सुकेवाडी येथील मंगेश पाराजी खिलारी याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. ३९६वा क्रमांक मिळवित ग्रामीण भागातील मुलेही स्पर्धा परीक्षेत मागे नसल्याचे  त्याने दाखवून दिले.    
 मंगेशचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शुक्लेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर, त्यांनी अकरावीला संगमनेरमधील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे बारावीचे शिक्षण पूर्ण  केले. पुुढे पुण्यातील एसपी महाविद्यालयातून कला शाखेत पदवी मिळविली आणि पुण्यातच राहून अभ्यास केला. 

आई-वडिलांना आनंदाश्रू
आजपर्यंत खूप कष्ट केले, मात्र आज मुलाचे यश पाहून आनंद झाला, असे सांगताना मंगेश याचे वडील पाराजी आणि आई संगीता यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. मंगेशने सुरुवातीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा ध्यास घेतला होता. बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून, त्याने कला शाखा निवडण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य होता, असे मंगेश यांच्या मित्राने सांगितले. आर्थिक अडचण असताना त्यातच स्वत:च्या गरजा पूर्ण करत भावाने यश मिळविले, असे त्याचे बंधू रवींद्र खिलारी याने सांगितले.

आईचे स्वप्न लेकीने साकारले 
nलातूर : लातूरची कन्या अन् अहमदनगरची सून शुभाली लक्ष्मीकांत परिहार- परदेशी यांनी यूपीएससी परीक्षेत देशात ४७३ वा रँक मिळविला आहे. मुलींनी शिकून अधिकारी व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या आई संगीता यांचे कर्करोगाने पाच वर्षांपूर्वी निधन झाले. आईने समोर ठेवलेला शिक्षणाचा विचार अमलात आणत शुभाली यांनी गुणवत्तेचे शिखर गाठले. 
nशुभाली या मूळच्या औसा तालुक्यातील राष्ट्रीय सेवाग्राम (चलबुर्गा) येथील असून, त्यांचे शालेय शिक्षण श्री देशिकेंद्र विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी केली. 

सेवा करुन आईची करणार इच्छापूर्ती
सोलापूर : लोकांची सेवा करण्यासाठी मी कलेक्टर व्हावे, अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यासाठी मी यूपीएससीची परीक्षा दिली आणि ५५ व्या रँकने उत्तीर्ण झाल्याची प्रतिक्रिया भावना एच. एस. यांनी व्यक्त केली. भावना मूळच्या बंगळुरू येथील रहिवासी असून सध्या सोलापूर रेल्वे विभागात असिस्टंट ऑपरेटिंग मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. या यशात विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

सात वर्षांनंतर पुन्हा मिळाले आयआरएस
अमरावती : यूपीएससीच्या परीक्षेत अंबानगरीतील लेकीने सात वर्षांनंतर पुन्हा एकदा यश संपादन केले. शहरातील केवल कॉलनीत राहणाऱ्या वैशाली धांडे हिने यूपीएससी २०२२ च्या परीक्षेमध्ये ९०८ वी रँक प्राप्त केली; परंतु वैशालीने २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आयआरएस कॅडर मिळवले होते. सध्या ती नागपूर येथे जीएसटी कार्यालयात कार्यरत आहे. आयएएस होण्याचे स्वप्न बाळगत २०२२ ची परीक्षा दिली. यश मिळाले; परंतु पुन्हा एकदा तिला आयआरएस कॅडरच मिळाले आहे.

झेडपी शाळा ते मिशन यूपीएससी!
नरखेड (नागपूर) : तालुक्यातील भिष्णूरच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या २५ वर्षीय प्रतीक कोरडे याने ६३८ वा रँक मिळविली आहे. निकालावर समाधान व्यक्त करीत प्रतीकने आयएएस होण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे.

मालवणच्या तुषारची यशाची नौका पार
मालवण (जि. सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या य़शाची मोहोर उमटवली आहे. नांदोस चव्हाणवाडी (ता. मालवण) येथील तुषार दीपक पवार (२४) याने ८६१ वी रँक प्राप्त केली आहे. तर वेंगुर्ला तालुक्यातील दोभोली येथील वसंत दाभोलकर याने ७६ वी रॅंक मिळविली आहे. खडतर अभ्यास करून हे यश प्राप्त केल्याची प्रतिक्रियी दोघांनी दिली.

शिकवणी न लावता मिळविले यश...
सांगली/इस्लामपूर :  सांगली जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकावला. वाळवा तालुक्यातील ऋषीकेश शिंदे १८३ वी,  इस्लामपूर येथील संकेत गरूडने ३७७ वी, तर सुभाषनगर (मिरज) येथील निहाल प्रमोद कोरे याने ९२२ वी रँक मिळवत यश मिळवले आहे.विशेष म्हणजे निहालने कोणतीही शिकवणी न लावता स्वत:च्या प्रयत्नावर यश मिळवले.  मिरज तंत्रनिकेतनमधून यांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण केलेला निहाल सात वर्षांपासून तयारी करत होता. 

Web Title: UPSC Result: Father used to sell tea, mother was a laborer but hoisted the flag in UPSC Mangesh Khilari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.