उरणचे सर्च आॅपरेशन थांबले
By admin | Published: September 25, 2016 01:00 AM2016-09-25T01:00:31+5:302016-09-25T01:00:31+5:30
तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांनी उरण परिसरातील सर्च मोहीम थांबविली आहे. संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून
नवी मुंबई : तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांनी उरण परिसरातील सर्च मोहीम थांबविली आहे. संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हे सर्च आॅपरेशन सुरू केले होते. त्याकरिता पोलिसांसह एनएसजी तसेच नेव्हीच्या तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या होत्या.
संशयित दहशतवाद्यांमुळे गेले तीन दिवस उरण परिसराला छावणीचे रूप आले होते. तिन्ही बाजूला असलेल्या समुद्रासह या परिसरात ओएनजीसी, जेएनपीटी पोर्ट, द्रोणागिरी अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. समुद्रमार्गे मुंबईही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर येऊ शकते. त्यामुळे नवी मुंबई पोलीस, शीघ्र कृती दल, एनएसजी यांच्या तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या होत्या. गुरुवार ते शनिवारी संध्याकाळपर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोम्बिंग आॅपरेशन हाती घेतले होते. त्याकरिता गुन्हे शाखेच्या सर्वच तुकड्यांसह ५० अधिकारी व सुमारे ७०० पोलीस कर्मचारी उरणमध्ये बंदोबस्तावर होते. तर आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त मधुकर पांडे, गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत व विशेष शाखा उपआयुक्त नितीन पवार हेदेखील तळ ठोकून होते.
पोलिसांची विविध पथके तयार करून शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून करंजा ते मोरा व पिरवाडी ते बोरी पाखडी असे सुमारे २५ किमी.चे क्षेत्र पूर्णपणे पिंजून काढण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेले हे कोम्बिंग आॅपरेशन शनिवारी संध्याकाळी पूर्ण झाले. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती सुरू असतानाच प्रत्येक घराची, रहिवासी सोसायट्यांची, बंद इमारती तसेच पडीक घरांची पाहणी केली जात होती. तसेच दहशतवाद्यांकडून लपण्यासाठी एखादे कुटुंब ओलीस ठेवले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक रहिवासी सुरक्षित आहे का याची खात्री पटवली. त्याशिवाय सागरी पोलिसांमार्फत बोटीतून सागरी किनारा, जेट्टीचा परिसर पिंजून काढण्यात आला. संशयित दहशतवाद्यांच्या शोधाकरिता पोलिसांचे हे सर्च आॅपरेशन सुरू असताना स्थानिकांचेही त्यांना योग्य सहकार्य लाभले. यामुळे शोधकार्य वेळीच पूर्ण होऊ शकले आहे. या तपासात संशयाचा एकही धागा हाती न लागल्यामुळे शनिवारी रात्रीपासून सर्च आॅपरेशन थांबवण्यात आले. दरम्यान, रहिवाशांवर दहशतीचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त व नाकाबंदी सुरूच राहणार आहे. तर शाळादेखील पोलीस बंदोबस्तात
सुरू ठेवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ मुलीची
अनेकदा चौकशी
संशयित दहशतवादी पाहिल्याचे सांगणाऱ्या त्या मुलीची दोन दिवसांत पोलिसांच्या विविध पथकांनी चौकशी केली. प्रत्येक वेळी ती वक्तव्यावर ठाम असल्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन सर्च आॅपरेशन सुरू केले होते. परंतु भर पावसात चालताना रस्त्यालगत थांबलेल्यांचे संभाषण कितपत ऐकता येऊ शकते, यावरही पोलिसांना संशय होता.