उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यात ५ ठिकाणी ‘उर्दू घर’ उभारणार; मंत्री नवाब मलिकांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:41 PM2021-06-30T18:41:58+5:302021-06-30T18:50:43+5:30

उर्दू भाषेचा विकास, मराठी व उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढविण्याच्या अनुषंगाने राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Urdu houses to be set up at 5 places in the state for development of Urdu language Says Nawab Malik | उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यात ५ ठिकाणी ‘उर्दू घर’ उभारणार; मंत्री नवाब मलिकांची घोषणा

उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यात ५ ठिकाणी ‘उर्दू घर’ उभारणार; मंत्री नवाब मलिकांची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देनांदेड येथील उर्दू घरासाठी ८.१६ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. या घराचे बांधकाम पूर्णसोलापूर येथे उर्दू घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याकरिता आतापर्यंत 6.82 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसित करण्यात येत आहे

मुंबई - राज्यात उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नांदेड येथील उर्दू घरासाठी ८.१६ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. आता या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. सोलापूर येथे उर्दू घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याकरिता आतापर्यंत 6.82 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. मुंबई येथे मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उर्दू घर बांधणे प्रस्तावित असून याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे. नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी ५० लाख रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

या उर्दू घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन ती उर्दू भाषेच्या विकासासाठी खुली करण्याच्या दृष्टीने विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे. या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी मूळ धोरण शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले होते. आता त्यात काही नवीन मुद्यांची भर घालण्यात आली असून सविस्तर नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच या उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन  करण्यात आली आहे.

उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविले जातील. यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविले जाईल. काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग चालविणे जाणार आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

उर्दू भाषेच्या विकासाला चालना देणे याबरोबरच मराठी आणि उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढून राज्यात सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने उर्दू घरे महत्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास मंत्री मलिक यांनी व्यक्त केला. लवकरच सर्व उर्दू घरांचे काम पूर्ण करुन व त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देऊन उर्दू घरे सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Urdu houses to be set up at 5 places in the state for development of Urdu language Says Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.