सर्वपक्षीय महिला आमदारांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

By Admin | Published: December 10, 2015 02:59 AM2015-12-10T02:59:53+5:302015-12-10T02:59:53+5:30

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा

Urge the chief minister of the all-party women MLAs | सर्वपक्षीय महिला आमदारांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

सर्वपक्षीय महिला आमदारांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

googlenewsNext

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरण्याचा निर्णय झाला. लगेच निवेदन तयार केले गेले, सौ. वर्षा गायकवाड, सौ. मंदाताई म्हात्रे, सौ. अनिता अशोक चव्हाण, श्रीमती सुमनताई पाटील यांच्यासह सर्वपक्षीय महिला आमदारांचा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या दालनात येऊन धडकला. तेथे काही पत्रकार बसलेले पाहून मंदाताई आणि वर्षा गायकवाड यांच्यात लटकी जुगलबंदीही झाली. वर्षाताई म्हणाल्या, तातडीने आयोगावर नेमणूक केलीच पाहिजे, त्यावर मंदाताई म्हणाल्या, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही केली. आता आम्ही नक्की करणार आहोत. घाई करू नका... आर.आर. पाटील यांच्या पत्नी सौ. सुमनताई ही तेथे होत्या. त्यांना नेमके काय बोलायचे हे माहीत नसल्याने त्या बुजल्यासारख्या दिसत होत्या. त्यांना वर्षातार्इंनी पुढे आणून बसवले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अनिता चव्हाण शेवटपर्यंत उभ्याच होत्या. मुख्यमंत्री फडणवीस आले, आणि सगळ्यांनी त्यांना निवेदन दिले. लवकरच नेमणूक करतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर लवकरच म्हणजे कधी, असा सवाल वर्षातार्इंनी केला. तेव्हा लवकर म्हणजे लवकरात लवकर... असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सगळ्या महिला मंडळात हंशा पिकला... शिष्टमंडळाचे काम झाल्यानंतर मंदातार्इंनी नवी मुंबईने स्मार्ट सिटीतून अंग काढून घेतल्याची तक्रार करून टाकली...

खडसे आणि गुलाबराव एकत्र
महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे तसे फारसे सख्य नाही. दोघेही जाहीरपणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज दोघे एकत्र आले तेही मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये. निमित्त होते, जळगावच्या केळ्यांना न्याय देण्याचे. शालेय पोषण आहारात केळी देणे सक्तीचे करा, असा आग्रह धरत जळगाव जिल्ह्यातील सगळे आमदार एकत्र आले. गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी पाटणादेवी येथे शून्याचा शोध लावला तर जागतिक दर्जाचे चित्रकार, शिल्पकार केकी मुस चाळीसगावचे. या दोघांचे स्मारक व्हावे, असा आग्रहही जळगावकर आमदारांनी धरला. शून्याचा शोध जर परदेशात लागला असता तर ते जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र झाले असते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या कामात लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आता आम्ही माध्यमांना काय सांगायचे असेही काहींनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशन संपण्याच्या आत निर्णय घेऊ... या निमित्ताने काही काळ का होईना, गुलाबराव आणि खडसे एकत्र आले. मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरला दोन दरवाजे. दोघे दोन दरवाजाने आत आले आणि वेगळ्या दरवाजाने गेले...

कोण म्हणतो, अधिवेशनात काम नाही...
हिवाळी अधिवेशनात काही काम होताना दिसत नाही. प्रत्येकाच्या सोयीने विषय हाताळले जात आहेत. मात्र ज्यांना येथे थांबण्याशिवाय पर्याय नाही त्यांना मात्र भरपूर कामे लागली आहेत... सकाळी गुलाबी थंडीत लवकर उठून पायी फिरायला जाणे, रोज सकाळी उद्या नक्की जीमला जायचे असा निर्णय घेणे, त्यानंतर नागपुरातील खाण्याचे अड्डे शोधून तेथे ब्रेकफास्ट करणे, विधानभवनात आल्यानंतर नागपुरी संत्र्यांचा ज्यूस पिणे, दुपारी कुणी ना कुणी आणलेले सावजीचे जेवण घेणे, सायंकाळी पुन्हा एकदा ज्यूसचा राऊंड घेत घेत रात्रीचे ‘नियोजन’ करणे यातच त्यांचा दिवस कधी संपतोय हे कळेनासे झाले आहे... उगाच नागपूरबाहेर राहणाऱ्यांना वाटते की नागपुरात असे काय काम असते... गैरसमज दूर व्हावा म्हणून हे सांगायला नको का...
४ अतुल कुलकर्णी

Web Title: Urge the chief minister of the all-party women MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.