महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही त्वरित कर्जमाफी द्या - उद्धव ठाकरे
By admin | Published: April 4, 2017 09:48 PM2017-04-04T21:48:03+5:302017-04-04T21:48:03+5:30
उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे. जर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तरी कर्जामाफीबाबत मागे का राहावे, असा सवाल उद्धव यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. निवडणूक प्रचारात दिलेले वचन योगी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पूर्ण केले, हे अभिमानास्पद आहे. कर्जमाफीचा घोषणा म्हणजे केवळ निवडणुकीतील पोकळ दावा नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच जर उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मागे का राहावे," असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारीपणा हे त्यामागचे मोठे कारण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही शिवसेनेची मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंपल्पीय अधिवेशनात विरोधकांबरोबरच शिवसेनेनेही सत्ताधारी भाजपाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कोंडीत पकडले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कर्जमाफीसाठी राज्यव्यापी संघर्षयात्रा काढत राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. आता उत्तर प्रदेशातही कर्जमाफी झाल्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जामाफीच्या मुद्यावर तोडगा काढताना दमछाक होणार आहे.