उरी येथील हल्ल्याचा निषेध
By admin | Published: September 24, 2016 01:33 AM2016-09-24T01:33:38+5:302016-09-24T01:33:38+5:30
हल्ल्याच्या निषेधार्थ कामशेत शहर शिवसेना व मुस्लिम समाजाच्या वतीने येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
कामशेत : उरी येथे भारतीय जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कामशेत शहर शिवसेना व मुस्लिम समाजाच्या वतीने येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजीमहाराज या प्रमुख चौकातून मोर्चा काढून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा परत चौकात आल्यानंतर सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी भाषण करून निषेध व्यक्त केला. मुस्लिमबांधवांनी उत्स्फूर्तपणे भाषण करून जोरदार घोषणाबाजी केली. सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत झाले. पाकिस्तानी दहशतवाद्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला. उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जातीपातीचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन उरी येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करायला हवा. या हल्ल्याबाबत जनसामान्यांत संतापाची भावना आहे, असे तालुकाप्रमुख खांडभोर म्हणाले.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपविभाग प्रमुख डॉ. विकेश मुथा, शहरप्रमुख गणेश भोकरे, दत्ता दौंडे व मुस्लिम समाजबांधव यांनी केले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भारत ठाकुर, भूषण जगताप, सुरेश गायकवाड, संतोष बोंबले, अंकुश सातकर, सागर मोरे, दत्ता वावरे, सब्बीर शेख, मुबारक खान, बाबुलाल पठाण, गणी शेख, रमजान पठाण, तौफिक शेख, साजिक तांबोळी, उमर शेख, मिस्टर खान, कारी हुसेमा खान, जुनेद शेख, अमिन शेख, अल्लादीन खान, इब्राहिम शेख व इतर उपस्थित
होते. (वार्ताहर)
>लोणावळ्यात शहीद जवानांना श्रद्धांजली
लोणावळा : उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना येथे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. याकरिता भांगरवाडीतील लोहगड दर्शन ते शिवाजी पुतळा चौक अशी निषेध रॅली काढत हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.
मावळ वार्ता फाउंडेशन, लायन्स क्लब-लोणावळा व खंडाळा, लायन्स सुप्रीमोज् व लोणावळेकर यांनी आयोजन केले होते. रॅलीत उमा मेहता, राजेश आगरवाल, श्रीधर पुजारी, विनय विद्वांस, किरण गायकवाड, संजय गायकवाड, राजेंद्र चौहान, आमिन वाडीवाल, बाळासाहेब फाटक, जितेंद्र टेलर, मारुती तिकोणे, बापुलाल तारे, सचिन तळेकर, संदीप वर्तक, प्रगती साळवेकर, मनीषा बंबोरी आदी उपस्थित होते.