सांगलीच्या १० वर्षाच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकींगचा विक्रम, हिमालयातील सरपास शिखर केले सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:05 PM2018-05-16T18:05:52+5:302018-05-16T18:05:52+5:30
हिमालयातील शिवालिक रेंज मधील १३ हजार ८०० फुटावरील काळाकुटट भोवताल उने ८ अंश सेल्शीअस तापमान आणि ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्याच वेगाने होणारी बर्फ वृष्टी, कडाडणा-या विजा अशा पार्श्वभूमीवर मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या १० वर्षाच्या मुलीने सरपास हे शिखर सर केले आहे. एवढया लहान वयात सरपास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय मुलगी ठरली आहे.
नवी दिल्ली/सांगली : हिमालयातील शिवालिक रेंज मधील १३ हजार ८०० फुटावरील काळाकुटट भोवताल उने ८ अंश सेल्शीअस तापमान आणि ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्याच वेगाने होणारी बर्फ वृष्टी, कडाडणा-या विजा अशा पार्श्वभूमीवर मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या १० वर्षाच्या मुलीने सरपास हे शिखर सर केले आहे. एवढया लहान वयात सरपास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीयन मुलगी ठरली आहे.
उर्वीने महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली, आमच्या सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कँप वरून ४ मे २०१८ पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे- छोटे ट्रेक केले. पुढे ७ मे पासून प्रत्यक्ष ट्रेक ला सुरुवात झाली. कसोल हे ६ हजार ५०० फुटावरचा बेस कँप असून पुढे ग्राहण (७६०० फुट) पद्री (९३०० फुट) मिन्थाज (११२००फुट) नगारू (१२५००फुट) बिस्करी (११०००फुट) आणि बंधकथाज (८०००फुट) असे कँप होते.
असे सर केले अवघड सरपास शिखर
माझ्या ट्रेकींगच्या या सर्व कँप मध्ये नगारु ते बिस्करी या कँप दरम्यान सरपास हे १३ हजार ८०० फुटांवरील शिखर आहे. आणि हे शिखर ट्रेकींगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे १४ कि.मी. चा संपूर्ण प्रवास बर्फातला असून अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे २ वाजता होते.
चहा आणि गरम पाण्याबरोबर गुळ व फुटाने हा अल्पोपहार करून मी ट्रेकींगला सुरुवात केली. मात्र, याच वेळेस वातारण अचनाक बिघडले आणि बर्फ वृष्टीला सुरुवात झाल्याचे उर्वीने सांगितले. अशाही परिस्थितीत ट्रेक करण्याची सूचना कँप लिडर यांनी दिल्याने पुन्हा पहाटे ३.१५ वाजता ट्रेकींगला सुरुवात झाली. २०० मिटर च्या अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. १४ मे २०१८ ला पठारावर पोहचल्याने सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता. माझ्या सारख्या लहानग्या मुलीसाठी ही खूप मोठी उपलब्धीही होती.
रितसर परवानगी मिळाली
मुळात सरपास या शिखराच्या ट्रेकींगसाठी युथ होस्टेल अशोसेशियन ऑफ इंडिया या आयोजक संस्थेने ट्रेकींगची वयोमर्यादा १५ वर्ष ठेवली आहे. यात मी जेमतेम १० वर्षाची असल्याने मला ही संधी मिळणार नव्हती पण, मी मनाचा हिय्या केला आणि हा ट्रेक करण्याचे ठरवले. माझ्या वडीलांनी या संस्थेला सहमतीपत्र लिहून दिले आणि मला सरपासकडे मोर्चा वळविण्याची रितसर परवानगी मिळाली.
अशी केली तयारी
हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारिरीकरित्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दीड तास समुद्र किनारपट्टी वरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफुड व सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, ट्रेकींग बुट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वी ने आत्मविश्वासाने सांगितले.
एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय
सरपास हे अत्यंत कठीण शिखर सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुनावला आहे आणि जगातील सर्वात कठीण एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एवरेस्ट बेस कँप करण्याचे माझे ध्येय असल्याचे उर्वी सांगते.