उरमोडी पुत्राच्या शौर्याला हजारोंचा ‘सॅल्यूट’
By Admin | Published: November 19, 2015 11:56 PM2015-11-19T23:56:56+5:302015-11-20T00:06:12+5:30
संरक्षणमंत्र्यांची हजेरी : पोगरवाडीत शहीद कर्नल महाडिक यांना अखेरचा निरोप; अंत्यदर्शनास लोटला जनसागर
सातारा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करणारे कर्नल संतोष महाडिक (घोरपडे) यांच्यावर गुरुवारी सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नल महाडिक यांच्या अंत्ययात्रेस हजेरी लावली. ‘संतोष महाडिक अमर रहे’च्या गगनभेदी गर्जना करीत हजारो नागरिकांनी या उरमोडीपुत्राच्या शौर्याला ‘सॅल्यूट’ केला. कर्नल संतोष यांचा मुलगा स्वराज याने त्यांना मुखाग्नी दिला.
कर्नल संतोष शहीद झाल्याचे वृत्त समजल्यापासूनच सातारा शहर आणि परळी खोऱ्यातील लोक शोकसागरात बुडाले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव साताऱ्यात आले. गुरुवारी सकाळी सजविलेल्या लष्करी वाहनातून पोगरवाडी येथे त्यांचे पार्थिव नेण्यात आले. सकाळी सातपासून या रस्त्यावर जागोजागी या शूर भूमिपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. डबेवाडी, भोंदवडे, पोगरवाडी फाटा येथे ग्रामस्थ साश्रुनयनांनी पार्थिवाची वाट पाहत होते. या रस्त्यावर ठिकठिकाणी कर्नल संतोष यांना अभिवादन करणारे फलक लावले होते.
कर्नल संतोष यांचे मूळचे आडनाव घोरपडे असून, आरे येथील मावशीकडे ते दत्तक गेले होते. पार्थिव पोगरवाडीत आणण्यापूर्वी आरे येथे नेण्यात आले. तेथे कर्नल संतोष यांना मानवंदना देण्यात आली. येथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सहकुटुंब उपस्थित होते. महाडिक कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. केंद्र सरकार कुटुंबीयांसोबत असल्याचे सांगून त्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर अंत्ययात्रा अकरा वाजता पोगरवाडीत आली. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कारांसाठी चबुतरा तयार करण्यात आला होता. तेथे मराठा लाइट इन्फन्ट्रीचे जवान आणि विविध रेजिमेंटचे अधिकारी-जवान उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे शाहू महाराज, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सशस्त्र दलांच्या वतीने नौदलाचे महाराष्ट्र एरियाचे फ्लॅग आॅफिसर रिअर अॅडमिरल मुरलीधर पवार, तसेच मराठा लाइट इन्फन्ट्री आणि पॅरा कमांडो फोर्सच्या कर्नल आॅफ दि रेजिमेंटनी पुष्पचक्र वाहिले. माजी लष्करी अधिकारी आणि जवानांनीही आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)
कुटुंबीयांचा अस्वस्थ करणारा आक्रोश
अंत्ययात्रा पोगरवाडीत येण्यापूर्वीच घोरपडे व महाडिक कुटुंबातील महिलांना चबुतऱ्याजवळ आणण्यात आले.
संतोष यांच्या आई कालिंदा घोरपडे आणि दत्तक आई बबई महाडिक यांच्यासह संतोष यांच्या पत्नी स्वाती, अकरा वर्षांची मुलगी कार्तिकी, बहीण विजया कदम, भावजय शोभा घोरपडे यांच्यासह महिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला घरे पाडणारा होता.
देवकी आणि यशोदेसारख्या दोन मातांचा हा पुत्र भारतमातेसाठी शहीद झाल्याने कुटुंबातील महिलावर्गाला शोक आवरत नव्हता.
संतोष यांचा लहानगा मुलगा स्वराज मात्र
अखेरपर्यंत कावराबावरा होऊन इकडेतिकडे पाहत
होता. पार्थिव चितेवर ठेवल्यानंतर जवानांनी राष्ट्रध्वज घडी करून संतोष यांच्या पत्नी स्वाती यांच्या हाती दिला, तेव्हा छोट्या कार्तिकीला जवळ घेऊन त्या ढसढसा रडत होत्या.
मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून सलामी दिली. त्यानंतर कर्नल संतोष यांचा सहा वर्षांचा मुलगा स्वराज याने त्यांना मुखाग्नी दिला. पार्श्वभूमीवर वाजणाऱ्या बिगुलाच्या ध्वनिलहरी उरमोडी खोरे व्यापून राहिल्या आणि साताऱ्याचा हा थोर सुपुत्र पंचत्त्वात विलीन झाला.
कर्नल संतोष महाडिक यांना गुरुवारी सकाळी पोगरवाडी येथे शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. पित्याला मुखाग्नी दिल्यानंतर काकासमवेत अंतिम विधी पार पाडत असताना लहानगा स्वराज भांबावून गेला होता.