पाकिस्तान दौऱ्यासाठी अमेरिकी एजन्सीचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 02:13 AM2016-03-24T02:13:17+5:302016-03-24T02:13:17+5:30

अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट आॅथॉरिटीने आपल्याला पाकिस्तान दौऱ्यासाठी पैसे दिल्याची माहिती या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने बुधवारी

US Agency Money for Pakistan tour | पाकिस्तान दौऱ्यासाठी अमेरिकी एजन्सीचे पैसे

पाकिस्तान दौऱ्यासाठी अमेरिकी एजन्सीचे पैसे

Next

मुंबई : अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट आॅथॉरिटीने आपल्याला पाकिस्तान दौऱ्यासाठी पैसे दिल्याची माहिती या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने बुधवारी उलटतपासणी दरम्यान विशेष न्यायालयाला दिली. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याच्या दोन वर्षे आधी म्हणजेच २००६ पर्यंत मी लष्कर-ए-तोयबाला सुमारे ७० लाख रुपये देणगी म्हणून दिल्याचेही हेडलीने विशेष न्यायालयाला सांगितले.
अमेरिकेतील तुरुंगात असलेल्या ५५ वर्षीय हेडलीची गेल्या महिन्यात मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविण्यात आली. २६/११च्या हल्ल्याप्रकरणी हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयाने ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मुंबईत सुरू असलेल्या खटल्यातील आरोपी अबू जुंदाल याचे वकील वहाब खान यांनी बुधवारपासून हेडलीची उलटतपासणी घेण्यास सुरुवात केली.
हेडलीला १९९८मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानला भेट देण्यासाठी अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अ‍ॅथॉरिटीने (डीईए) एकदा पैसे पुरवले होते. मी डीईएच्या संपर्कात होतो. मात्र १९८८ ते १९९८ दरम्यान मी डीईएला माहिती पुरवत होतो किंवा त्यांना सहाय्य करत होतो, या आरोपात
तथ्य नाही, असे हेडलीने उलटतपासणीवेळी सांगितले.
हेडलीच्या साक्षीच्या विश्वासार्हतेवर अ‍ॅड. वहाब खान यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘भूतकाळात दोनदा कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या हेडलीने अमरिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. हेडलीला १९८८ आणि १९९८ मध्ये ड्रग स्मगलिंग केसमध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. दोन्ही वेळा हेडलीने अमेरिकेबरोबर पुन्हा गुन्हा करणार नाही, अशा आशयाचा करार अमेरिका सरकारबरोबर केला. तरीही तो मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी झाला. अमेरिकेने त्याला गांभीर्याने न घेता सहजच सोडून दिले,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. वहाब खान यांनी विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे केला.
मी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी व्हायचे नाही, अशी एक अट करारात घालण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये जाऊन लष्करच्या संपर्कात राहून मी या कराराचे उल्लंघन केले. १९८८मध्ये ठोठावलेली चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर मी १९९२ ते १९९८ मध्ये ड्रग स्मगलिंगमध्ये उतरलो. त्यासाठी मी अनेक वेळा पाकिस्तानला गेलो, असेही हेडलीने उलटतपासणीच्या वेळी सांगितले.
हेडलीने लष्करकडून पैसे घेतले का, अशी वारंवार विचारणा केल्यावर हेडली संतापला. ‘मी वारंवार सांगितले की, मी एलईटीकडून पैसे घेतले नाही. तुम्हाला (वहाब खान) या भाषेमध्ये सांगितलेले समजत नसेल तर मी उर्दूमध्ये सांगतो,’ असे हेडलीने म्हटले. त्याच्या या उत्तरावर खान हसले. त्यांचे हसणे पाहून हेडलीने संतापत म्हटले की, तुमच्या अशिलाची (अबु जुंदाल) केस या साक्षीवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही गंभीर असायला हवे...जोक करू नका.
हेडली एलईटीचा आॅपरेटीव्ह असल्याची माहिती डॉ. राणाला होती.
मूळचा पाकिस्तानचा आणि हेडलीचा सहकारी डॉ. तहव्वूर राणाला हेडली लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेटीव्ह असल्याची माहिती होती, खुद्द हेडलीने विशेष न्यायालयासमोर मान्य केले.
मी एलईटीसाठी काम करत आहे, यावर राणाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे राणाने मला मुंबईतील त्याचे कार्यालय सोडण्यास सांगितले. मी त्याची आज्ञा पाळून जुलै २००८ मध्ये कार्यालय बंद करण्यासाठी पावले उचलली. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी राणाने मुंबईला भेट दिली होती. त्यानंतर हल्ला होईपर्यंत तो माझ्याबरोबर होता, असेही हेडलीने स्पष्ट केले.
डेन्मार्क कटात (मिकी माऊस) राणा माझ्याबरोबर सहभागी नव्हता, मीच या कटात होतो. राणा मला यात अधेमधे मदत करत असे. मात्र ती मदत छोट्या स्वरूपाची होती, असेही हेडलीने सांगितले.

Web Title: US Agency Money for Pakistan tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.