अमेरिकेचे दात घशात - ऑनलाइन पीटिशनच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
By admin | Published: October 6, 2016 09:23 AM2016-10-06T09:23:38+5:302016-10-06T09:23:38+5:30
'पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारे राष्ट्र म्हणून घोषित करावे' या मागणीसाठी व्हाईट हाऊसच्या ऑनलाइन वेबसाईटवर याचिका दाखल झाली होती.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - 'पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारे राष्ट्र म्हणून घोषित करावे' या मागणीसाठी व्हाईट हाऊसच्या ऑनलाइन वेबसाईटवर याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या मुद्दावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमेरिकी राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे. अमेरिकेने नेहमीच पाकिस्तानला पाठिशी घातले. त्यांना आर्थिक रसद पुरवली पण अमेरिकन जनतेने पाकिस्तानविरोधीत या याचिकेला तुफान प्रतिसाद देऊन अमेरिकी राज्यकर्त्यांचे पाकप्रेमाचे दात त्यांच्याच घशात घातले, अशी शब्दांत उद्धव यांनी हल्ला चढवला आहे.
अमेरिकन जनतेने जे केले ते महत्वाचे आहे. मात्र जनतेच्या या प्रतिसादानंतर अमेरिकेच्या ‘नापाक’ प्रेमाचा पान्हा आटतो की तसाच कायम राहतो हे मात्र भविष्यातच दिसेल, असेही उद्धव यांनी ' सामना'च्या अग्रलेखात नमूद केले आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- अमेरिका जागतिक महासत्ता असल्याच्या आविर्भावात आणि जगात सर्वत्र दादागिरी करण्याचा स्वयंघोषित ठेका असल्याच्या थाटात नेहमीच वावरत असते. जगातील कोणत्याही देशाच्या न्यायाचा तराजू आपल्याच हातात आहे आणि आपण त्याचे कोणतेही पारडे खाली-वर करू शकतो, असेच आजवर अमेरिकन राज्यकर्त्यांचे वागणे राहिले आहे. पण नियतीच्या दरबारात अमेरिकेची स्वयंघोषित दादागिरी चालत नाही. व्हिएतनाम युद्धापासून क्यूबासारख्या देशाबाबतच्या बदललेल्या भूमिकेपर्यंत अमेरिकेला अनेक बाबतीत आपले दात आपल्याच घशात घालून घ्यावे लागले आहेत. आताही अमेरिकेला असाच एक अनुभव आला आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा पोशिंदा असल्याचे माहीत असूनही अमेरिकेने दशकानुदशके त्या देशाच्या ओंजळीत अब्जावधी डॉलर्सचे अर्थसहाय्य, अत्याधुनिक युद्धसामग्री, एफ-१६ सारखी लढाऊ विमाने यांचे माप टाकले. आता त्याच अमेरिकेतील जनतेने ‘पाकिस्तानला दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून घोषित करावे’ अशी मागणी करणार्या ऑनलाइन याचिकेला उदंड प्रतिसाद दिला आहे.
- व्हाइट हाऊसला पाठविण्यात आलेल्या या याचिकेवर मंगळवारी एका दिवसात ५० हजार सह्या झाल्या. त्यामुळे याचिकेवर स्वाक्षर्या करणार्यांची संख्या साडेसहा लाखांपेक्षा जास्त झाली आहे. पाकिस्तानबाबत सर्वसामान्य अमेरिकी जनतेच्या मनात किती प्रचंड संताप आहे याचाच हा पुरावा. पाकिस्तानची धर्मांधता, दहशतवादाच्या माध्यमातून हिंदुस्थानविरुद्ध पुकारलेले छुपे युद्ध आणि जागतिक शांततेला पाक पुरस्कृत दहशतवादाने निर्माण झालेला धोका याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानला पोसणार्या आजवरच्या अमेरिकी सरकारांसाठी हा ‘काव्यगत न्याय’च म्हणावा लागेल. अर्थात त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर खूप प्रभाव पडेल असे नाही.
- पाकिस्तानबद्दलच्या परंपरागत अमेरिकी धोरणात मोठा बदल होईल, अमेरिका पाकिस्तानला मांडीवरून ढकलेल आणि हिंदुस्थानला डोक्यावर बसवेल असेही नाही. तरीही या याचिकेची नोंद हिंदुस्थान, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या परस्पर संबंधांच्या भवितव्याचा विचार करताना घ्यावी लागेल. या याचिकेमुळे कदाचित अलीकडील काळात हिंदुस्थानप्रति अमेरिकेच्या दृष्टिकोनातून जो सकारात्मक बदल होताना दिसत आहे त्याला ‘बुस्टर डोस’ मिळू शकेल. सामान्य अमेरिकी जनतेच्या तीव्र भावनांचा काही प्रमाणात तरी विचार अमेरिकी लोकप्रतिनिधींना करावा लागेल. जागतिक राजकारणात अशा ‘जर-तर’ सिद्धांताला तसा अर्थ नसतो हे खरेच, पण पाकिस्तानबद्दल अमेरिकी जनतेच्या मानसिकतेचा ‘इंडेक्स’ म्हणून ऑनलाइन याचिकेला मिळणार्या प्रतिसादाकडे पाहावे लागेल.