US Election 2020: ९३ टक्के मते घेऊन मराठी माणूस मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहात
By Aparna.velankar | Published: November 7, 2020 02:58 AM2020-11-07T02:58:14+5:302020-11-07T06:35:40+5:30
US Election 2020: बेळगावमध्ये अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेले ठाणेदार एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. त्यांच्या ‘मिलेनियर’ होण्याची कहाणी मराठी वाचकांना सुपरिचित आहे.
- अपर्णा वेलणकर
नाशिक : ‘अमेरिकेची दारं बंद झाल्यासारखं अधुनमधून वाटू शकेल, हा देश आत्मकेंद्री बनला असून जगातल्या कर्तृत्वाला आकर्षून घेण्याची अमेरिकेची क्षमता मंदावली आहे अशीही शंका येईल, पण स्वातर्य-समान संधी-समान हक्क आणि सर्वंकष लोकशाही ही मूल्यं या देशाच्या रक्तात रुजलेली आहेत; ती मंदावलेली दिसली तरी पुन्हा नव्याने उसळी घेतील, ‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही’ अशी खात्री मिशीगन राज्याचे स्टेट रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे श्रीनिवास ठाणेदार यांनी व्यक्त केली आहे. डेमोक्रैट्स आणि रिपब्लिकन यांच्यामध्ये अर्धा विभागलेला ‘अमेरिकन दुभंग’ अध्यक्षीय निवडणुकीने पृष्ठभागावर आणल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार ‘लोकमत’शी बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशी आक्रमक आणि हटवादी भूमिका घेऊन निवडणूक निकालाच्या बाबतीत कज्जेदलाली सुरू केलेली असली, तरी अमेरिकन राज्यघटना जी मूल्ये मानते, त्याच्या विरोधी निकाल अमेरिकन न्यायालये कधीही देणार नाहीत; त्यामुळे जो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटेत कसलेही न्यायालयीन अडथळे येणार नाहीत, अशी खात्रीही ठाणेदार यांनी व्यक्त केली.
बेळगावमध्ये अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेले ठाणेदार एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. त्यांच्या ‘मिलेनियर’ होण्याची कहाणी मराठी वाचकांना सुपरिचित आहे.
मी आज या देशाच्या कृपेने धनवान झालेला असलो, तरी दारिर्य म्हणजे काय आणि संधींचा अभाव किती क्लेशदायक असतो याचा अनुभव मी घेतलेला आहे, हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना पटले, म्हणूनच त्यांनी मला ही संधी दिली आहे.
- श्रीनिवास ठाणेदार