अमेरिकी दूतावासाचा ‘व्हिसा डे’ दिमाखात
By admin | Published: June 10, 2016 02:23 AM2016-06-10T02:23:34+5:302016-06-10T02:23:34+5:30
जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्ही यश संपादन करू शकता
मुंबई : जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्ही यश संपादन करू शकता, हे सिद्ध करून दाखवत मुंबईतील श्वेता कठी आणि अकील चिनॉय या विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाची संधी मिळवत देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची अनेकांची इच्छा असते. दरवर्षी शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी हजारो मुले परीक्षा देतात. पण त्यातील काहीच मुले अनेक स्तर पार करत प्रत्यक्ष शिक्षण घेतात. अशाच हरहुन्नरी विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा उलगडण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील यूएस व्हिसा काऊंसिलेट येथे ‘व्हिसा डे’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या ५ विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास उलगडून सांगितला.
कामाठीपुरासारख्या रेड लाइट परिसरात वाढलेल्या श्वेता कठीचा प्रवास आदर्श आहे. श्वेताने महापालिकेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. दहावीनंतर काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून यूएस दूतावासाशी तिचा संपर्क आला. मुलाखतीनंतर तिच्यातील अभ्यासाची चुणूक ओळखून तिला अमेरिकेतील बोर्ड महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. शिवाय तिला महाविद्यालयाची शिष्यवृत्तीदेखील मिळाली. विशेष म्हणजे कामाठीपुरासारख्या परिसरात राहून अमेरिकेत शिकणारी ती एकमेव मुलगी आहे. तिच्या या कार्याबद्दल तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या श्वेता वॅटसन विद्यापीठात सोशल इंटरप्रिनरशिप विषयाचा सखोल अभ्यास करत आहे.
आयटी क्षेत्रात स्वत:ची वेगळीच ओळख प्रस्थापित केलेला अकील चिनॉय मूकबधिर आहे. त्याचे आई-वडीलदेखील मूकबधिर आहेत. पण शिक्षणाचे महत्त्व पालकांना असल्यामुळे असलेल्या परिस्थितीवर मात करत त्याने शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने थेट अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने कॉम्प्युटर सायन्स विषयातील पदवी मिळवली आहे आणि सध्या तो मुंबईतील आयटी कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. याशिवाय सृष्टी आचरेकर (अॅग्रिकल्चरल अॅण्ड बायोलॉजीकल इंजिनीअरिंग), मनमोहन थोरात (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), सखी भुरे (अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स विषयाचे शिक्षण अमेरिकेतील विद्यापीठांमधून घेत आहे. याप्रसंगी मुंबईचे यूएस काऊंसिलर चिफ मायकल इवान्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इतर विषयांना प्राधान्य
अमेरिकेत करिअरसोबतच अन्य विषयांना प्राधान्य दिले जाते. तुमच्या आवडीच्या विषयाच्या वर्गात तुम्ही हवे तेव्हा बसू शकता. त्यामुळे करिअरसोबत आवडही जोपासण्याची मुभा अमेरिकेतील शिक्षणात दिली जाते.