अमेरिकी तपास यंत्रणांना आरिफच्या चौकशीत रस
By Admin | Published: December 4, 2014 02:50 AM2014-12-04T02:50:13+5:302014-12-04T02:50:13+5:30
इराकमधील इस्लामिक स्टेटच्या संघर्षात सहभागी होऊन परतलेल्या कल्याणमधील आरिफ माजिदच्या चौकशीत अमेरिकी तपास यंत्रणांनी रस दाखवला आहे
डिप्पी वांकाणी, मुंबई
इराकमधील इस्लामिक स्टेटच्या संघर्षात सहभागी होऊन परतलेल्या कल्याणमधील आरिफ माजिदच्या चौकशीत अमेरिकी तपास यंत्रणांनी रस दाखवला आहे. मात्र अमेरिकेला जशास तशी वागणूक द्यावी, असे मत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
२६/११ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या कटात सहभागी असलेला आरोपी डेव्हिड हेडली याच्यावर अमेरिकेत खटला चालवला गेला. त्या वेळी हेडलीच्या चौकशीसाठी गेलेल्या भारतीय तपास अधिकाऱ्यांना अमेरिकेने फारसे सहकार्य केले नव्हते. आता अमेरिकेलाही जशास तशी वागणूक द्यावी, असे मत अनेक भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
माजिदकडे इस्लामिक स्टेट आणि त्यांच्या सद्य:स्थितीबद्दल माहितीची खाण असेल आणि त्याची चौकशी करण्याची संधी मिळाली, तर या माहितीची इराक आणि सिरियात त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी मोठी मदत होईल, असे अमेरिकी तपास यंत्रणांना वाटते. त्यामुळे त्यांनी भारताकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. माजिदला भारतात परत आणल्यापासूनच्या घडामोडींवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेला माजिदकडून इस्लामिक स्टेटची संघटनात्मक बांधणी, हालचाली, ठावठिकाणे, शस्त्रसज्जता अशा अनेक बाबींची माहिती मिळवण्यात रस आहे. त्यावरून त्या संघटनेविरुद्धचे हल्ले अधिक प्रभावी करता येतील.
मात्र अमेरिकेला माजिदची चौकशी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी बऱ्याच कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल. प्रथम भारतातील न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. ज्या भारतीय नागरिकाने अमेरिकेविरुद्ध कोणताही गुन्हा केलेला नाही त्याची चौकशी करण्याची परवानगी आपली न्यायालये अमेरिकेला देतील याबद्दल साशंकता वाटते. समजा तशी परवानगी मिळाली तरीही त्यांनी आपल्याला जशी वागणूक दिली तशीच वागणूक त्यांनाही देण्यात यावी, असे एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.