अमेरिकी पोलिसांना मिळाले विकी-‘एव्हॉन’ कनेक्शनचे दुवे
By Admin | Published: April 30, 2016 04:47 AM2016-04-30T04:47:47+5:302016-04-30T04:47:47+5:30
महाराष्ट्रातील सोलापूरमधील ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीचे एकमेकांशी कनेक्शन असल्याचे पक्के दुवे अमेरिकी पोलिसांच्या हाती लागले
जितेंद्र कालेकर,
ठाणे- आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि महाराष्ट्रातील सोलापूरमधील ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीचे एकमेकांशी कनेक्शन असल्याचे पक्के दुवे अमेरिकी पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, हरदीपने परदेशात पाठविण्याचा जो अमली पदार्थांचा साठा समुद्रात फेकला त्याची खातरजमा करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. इफेड्रीनच्या बेकायदेशीर साठ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केल्यामुळे एव्हॉनचा एक संचालक मनोज जैन याने आता कंपनीचा राजीनामा दिला आहे.
जैन याने कंपनीतील कच्च्या मालाचा पुरवठादार जयमुखी व किशोर राठोड यांच्यासोबत केनियात जाऊन विकी गोस्वामीशी बैठक घेतली होती. सोलापुरातील कंपनीतून इफेड्रीन आणि सुडो इफेड्रीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्याचे ठरले होते. तसेच काही माल यापूर्वीच धाडला होता. एव्हॉन कंपनीतून विकीशी जो संवाद साधला गेला, त्यावर अमेरिकन पोलिसांची नजर होती. ही कंपनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वितरण करीत असल्याची कुणकुणही त्यांना लागल्याची माहिती अमेरिकेच्या जस्टीस ड्रग इन्फोर्समेंटचे भारतातील प्रमुख डेरेक ओडने यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दिली आहे.
>केनिया-भारत आरोपी प्रत्यार्पण करार नाही...
>केनिया आणि भारत यांच्यात आरोपी प्रत्यार्पणाचा कोणताही करार नाही. त्यामुळे केनियात असलेल्या विकी गोस्वामीला भारतात आणण्यात कायदेशीर अडचणी आहेत. अर्थात, अमेरिका त्यासाठी सर्वतोपरीने सहकार्य करणार असल्याचेही ओडने यांनी सांगितले आहे.
हा करार नसल्यामुळे त्याच्यावर केवळ रेड कॉर्नर नोटीस बजावलेली आहे. या नोटीसीमुळे कोणत्याही देशात तो असला तरी त्याच्यावर अनेक बंधने येतील. शिवाय, कोणत्याही देशाबाहेर तो पडल्यास त्याची माहितीही तातडीने भारतासह अमेरिकेलाही मिळणार आहे. अशी कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडणे सोपे जाणार असल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>मनोज जैन याचा राजीनामा
सुमारे २३ टन इफे ड्रीन आणि सुडो इफेड्रीनच्या साठयाप्रकरणी ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीचा संचालक मनोज जैन याला तीन दिवसांपूर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. याप्रकरणी चौकशी सुरु असल्यामुळे त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो संचालक मंडळाने मान्य केल्याचे पत्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला कंपनीने दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पुन्हा संचालकपदी नेमण्याचा निर्णय कंपनीकडून घेतला जाणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. ठाणे पोलिसांसह सर्वच तपास यंत्रणांना कंपनीकडून संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
>हरदीपने फेकलेल्या मालाची पडताळणी होणार
एका शिपिंग कंपनीचा क्रेडिट अॅन्ड फारवर्डींग मॅनेजर हरदीप गिल याने परदेशात पाठविण्यासाठी एव्हॉनचा सल्लागार आणि यातील सूत्रधार पुनित श्रींगीकडून आधी ४० किलो त्यानंतर ४० आणि पुन्हा १०० असे १८० किलो इफे ड्रीन आणले होते.
तो माल त्याने उरणच्या समुद्रात फेकल्याचा दवा त्याने ठाणे पोलिसांकडे केला आहे. त्याआधारे चाचपणी केली जात आहे. जर तो खरा किंवा खोटा असला तरी शिपींग कंपनीचा संचालक सुशिल सुब्रमण्यम याचीही चौकशी केली जाणार आहे.
हरदीप आणि सुब्रमण्यम यांनी यातून आपला बचाव होण्यासाठीच हा माल समुद्रात फेकल्याची किंवा दडवल्याची शक्यता आहे. सुब्रमण्यम किंवा हरदीप दोषी नव्हते तर त्यांनी माल दडविण्याचाही प्रश्न नव्हता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे एव्हॉन प्रमाणेच शिपिंग कंपनीचा संचालक सुब्रमण्यम आता पोलिसांच्या रडारवर आला आहे.
>वॉन्टेड लिस्ट :
मुख्य ड्रगमाफिया विकी गोस्वामी, शिपिंग कंपनीचा संचालक सुब्रमण्यम, मालाचे वितरण करणारा किशोर राठोड, नरेंद्र काचा आणि जयमुखी आदींचा ठाण्यासह देशभरातील पोलीस शोध घेत आहेत. तर एव्हॉन सायन्सेसच्या अजित कामत आणि राजेंद्र कैमल या उर्वरित दोन संचालकांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.