मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर
By admin | Published: May 14, 2016 03:01 AM2016-05-14T03:01:52+5:302016-05-14T03:01:52+5:30
मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल.
संजय देशपांडे, औरंगाबाद
मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल. बीअरच्या सहा कारखान्यांनी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटर, तर विदेशी मद्य तयार करणाऱ्या चार कारखान्यांनी ७ कोटी ६३ लाख १६,६१९ लिटर उत्पादन घेतले. २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत बीअरनिर्मितीत तीन टक्के, तर विदेशी मद्यनिर्मितीत नऊ टक्के वाढ झाली.
औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या क्षेत्रातील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाणी पुरवले जात होते. ‘लोकमत’ने ७ व ८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झालेल्या. मद्यनिर्मिती कंपन्यांच्या पाण्यात ६० टक्के, तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिणामी उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. अशी झाली वाढ
२०१४-१५ यावर्षी ६ कोटी ९९ लाख ६८,३४० लिटर विदेशी मद्य तयार झाले.
२०१५-१६ मध्ये ७ कोटी ७३ लाख १६,६१६ लिटर मद्य तयार झाले. उत्पादनात ९ टक्के वाढ झाली.
२०१४-१५ यावर्षी ३० कोटी १६ लाख ५२,१५७ लिटर बीअर तयार झाली.
२०१५-१६ यावर्षी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटरची निर्मिती झाली. उत्पादनातील वाढ ३ टक्के आहे.
२०१४-१५ यावर्षात राज्य सरकारला ३,१५५ कोटी रुपयांचा, तर २०१५-१६ यावर्षी ३,५४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.