'मिडिया व्हॅल्यू' मिळविण्यासाठी 'भुजबळ' नावाचा वापर;कांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 06:26 PM2021-09-29T18:26:21+5:302021-09-29T18:30:08+5:30
भुजबळ म्हणाले, पोलिसांनी संपुर्णपणे तपास करावा फोन कॉलचे रेकॉर्डिंग तपासावे यामध्ये आमचा काहीही एक संबंध नाही. 'भाई' युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत यावेळी काढला.
नाशिक : राजकारणात 'मिडिया व्हॅल्यू' मिळविण्यासाठी 'भुजबळ' नावाचा वापर केला गेला. कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याच्या कुटील डाव असून त्याची तक्रार मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही 'भाई' युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही, असा टोलाही यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी भुजबळ हे बुधवारी (दि.२९) दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकमधील मालेगाव स्टॅन्ड येथील अहल्यादेवी होळकर पुलावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पोलिसांनी संपुर्णपणे तपास करावा फोन कॉलचे रेकॉर्डिंग तपासावे यामध्ये आमचा काहीही एक संबंध नाही. 'भाई' युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत यावेळी बोलताना काढला. ज्या अशोक निकाळजे नावचा कांदे यांनी तक्रार अर्जात उल्लेख केला आहे, त्यांनीच भुजबळ यांच्याशी आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने प्रश्न मिटतो. उलट कांदे यांनीच 'मी आमदार आहे, तुला शिकवितो असा दम दिला' असा आरोपही निकाळजे यांनी केल्याचे भुजबळ म्हणाले. यामुळे आता पोलीस प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, याबाबत मी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशीही चर्चा केली आहे, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
'कांदे, संदर्भ भुजबळांचाच देतात'
कांदे म्हणतात मी भुजबळांचे नाव घेतले नाही, आणि तक्रार अर्जात माझ्याच पदाचा नामोल्लेख करतात अन् संदर्भ माझ्याच नावाचा देतात असेही छगन भुजबळ म्हणाले. राजकारणात अशा प्रकारच्या आरोप करण्यापुर्वी गांभीर्याने विचार करायला हवा, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.