रेल्वेमध्ये ब्रेल लिपीचा वापर
By Admin | Published: May 24, 2015 01:43 AM2015-05-24T01:43:56+5:302015-05-24T01:43:56+5:30
आता अंध प्रवाशांसाठी रेल्वे बोगीत आसन व्यवस्था, शौचालय, दरवाजे, वॉश बेसीन आदी ठिकाणी ब्रेल एम्बेडेड (अंध लिपी) प्लेट लावण्यात येत आहेत.
अविनाश चमकुरे ल्ल नांदेड
प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. आता अंध प्रवाशांसाठी रेल्वे बोगीत आसन व्यवस्था, शौचालय, दरवाजे, वॉश बेसीन आदी ठिकाणी ब्रेल एम्बेडेड (अंध लिपी) प्लेट लावण्यात येत आहेत. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने राज्यात प्रथमच अशा प्लेटचा रेल्वेगाडीत वापर केला आहे.
नांदेड-पुणे एक्स्प्रेसच्या शयनयान, एसी डब्यात ब्रेल लिपीतील सूचना फलक लावण्यात आले आहेत. आसनव्यस्था, कोच क्रमांक, शौचालय, वॉश बेसीन, आपत्कालीन खिडकी, अलार्म चेन, बर्थ आदी ठिकाणी ब्रेल लिपी असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत़ त्यामुळे कोणाच्याही मदतीविना अंध प्रवासी आरक्षित आसनापर्यंत सहज पोहचू शकतील़ तसेच विविध सुविधांचाही उपयोग सुलभतेने करतील़ ब्रेल एम्बेडेड बोर्ड वापरात आणण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून त्याची सुरुवात नांदेडमधून झाली.
नेत्रहीन व्यक्तींचा प्रवास सुकर व्हावा, या हेतूने २०१३-१४च्या रेल्वे अर्थसंकल्पात विशेष कोच तयार करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चेन्नई येथील इंटीग्रल कोच कारखान्यात ब्रेल एम्बेडेड बोर्ड तयार करण्यास प्रारंभ झाला़
१६ फेब्रुवारी २०१४ रोजी
नवी दिल्ली-पुरी (ओरिसा) पुरुषोत्तम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील कोचेसमध्ये सर्वप्रथम ब्रेल एम्बेडेड बोर्ड
लावण्यात आले़ आता सर्वच गाड्यातील जुने बोर्ड काढून नव्याने तयार केलेले बोर्ड बसविले जात आहेत़