रासायनिक खतांचा हेक्टरी वापर घटतोय!
By admin | Published: September 14, 2016 12:25 AM2016-09-14T00:25:21+5:302016-09-14T00:25:21+5:30
दुष्परिणामाबाबत शेतकरी सतर्क; राज्यात रासायनिक खताच्या वापरात घट होत असून प्रति हेक्टर १७२ किलोवरुन १0७ किलोवर.
संतोष वानखडे
वाशिम, दि. १३ : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असल्याचा अनुभव शेतकर्यांना येत आहे. या अनुभवातूनच आता शेतकर्यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळला असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २0१२ मध्ये राज्यात हेक्टरी १७२ किलोग्रॅम असलेला वापर २0१५ मध्ये १0७ किलोग्रॅमवर आला असून, २0१६ च्या खरीप हंगामात हा वापर सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
रासायनिक खते व कीटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे अन्नधान्य व भाजीपालावर्गीय पिकांवर कीटकनाशकांचा होत असलेला अतिरिक्त फवारा मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारा आहे. खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर कीटकनाशकांचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा आहे. खत व कीटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलोग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षित आहे. हा वापर २0१२ पर्यंत सरासरी १७२ किलोग्रॅमपर्यंत पोहोचला होता, असे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जमिनीचा पोत बिघडणे आणि भाजीपालावर्गीय पिकांसाठी धोकादायक ठरणे आदींचे महत्त्व शेतकर्यांना समजू लागल्याने त्यानंतर हळूहळू रासायनिक खतांचा अतिवापर कमी होत गेल्याचे दिसून येते. राज्यात सन २0११-१२ मध्ये दर हेक्टरी सरासरी १७२ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. सन २0१२-१३ मध्ये दर हेक्टरी ११९ किलोगॅ्रम, सन २0१४ मध्ये दर हेक्टरी १२५ अणि सन २0१५ मध्ये दर हेक्टरी १0७ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. २0१६ च्या खरीप हंगामातील निश्चित आकडेवारी राज्यस्तरावर अद्याप संकलित झाली नाही. तथापि, हा वापर दर हेक्टरी सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली.