ओसाड माळरानावर दुहेरी शेतीचा प्रयोग
By Admin | Published: November 4, 2016 09:01 AM2016-11-04T09:01:56+5:302016-11-04T09:01:56+5:30
इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील काशिनाथ पांडुरंग कोरडे यांनी दुहेरी आंतरशेती फुलविण्याचे काम करत कारले आणि टमाट्याचे भरघोस उत्पन्न मिळवले.
वासाळीच्या शेतकऱ्याची जिद्द : कारले, टमाट्याचे घेतले भरघोस उत्पन्न
लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. ४ - पारंपारिक शेती निसर्गचक्राच्या अनियमतितेमुळे तसेच अनियोजित पद्धतींमुळे फसत आहे. मात्र असे असतानाही शेती उद्योगाची पुन्हा आस बाळगून सेंद्रीय शेती आत्मसात करत आदिवासी भागात दुहेरी शेती करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा करत एका शेतक-याने दुहेरी आंतरशेती फुलविण्याचे काम इगतपुरी तालुक्यात केले आहे. वासाळी येथील काशिनाथ पांडुरंग कोरडे यांनी दुहेरी शेती कर कारले आणि टमाट्याचे भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी रासायनिक शेती पद्धतीचा अवलंब करीत असताना कोरडे यांनी दोन एकरच्या ओसाड माळरानावर यंत्राच्या साहाय्याने जमिनीचे आरोग्य तपासून व सपाटीकरण करून आंतरिपकासाठी चहूबाजूने लाकडी बांबू उभारून उपयुक्त कारले व टमाट्याची दुहेरी शेती केली आहे. पारंपारिक शेती व्यवसायाला प्रचंड आत्मविश्वास आणि अचूक नियोजनाची जोड देत नुसतेच अश्रू ढाळीत न बसता नवनवीन प्रयोगांच्या शोधात ओसाड माळरानावर ५५ ते ६० दिवसात देखील यशस्वी शेती करून दाखवत नवा आदर्श समोर आला आहे.
कोरडे यांनी कृषिसहाय्यक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाने हा प्रयोग उभा केला. दोन एकरच्या ओसाड माळरानावर या शेतकर्याने फुलवलेली कारले व टमाट्याची आंतरपीक शेती शेतकऱ्यांसाठी नक्कीच आदर्श उदाहरण ठरत आहे. माळरानावर केलेल्या या शेतीतून त्यांना उत्पादन देखील चांगले मिळत आहे. शेती व्यवसायात अनेक दु:खाच्या आसवांचा झुंजारपणाने सामना करून केवळ आत्मविश्वासाच्या बळावर या आदिवासी शेतकऱ्याने माहिती तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाने उभी केलेली शेती आदर्शदायी ठरत आहे. शेतीत बरच काही करता येतं ते करण्यासाठी उरी जिद्द व प्रयत्नांची पराकाष्ठा असावी लागते ते कोरडेंच्या व्यक्तीरेखेतून प्रतीत होतेय. वासाळी गावी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असते परंतु आता गावाला जलयुक्त शिवार अभियानाची मोठी मदत मिळत आहे. थेंब थेंब पाणी साचविण्याचे महत्त्व ग्रामस्थांना आता हळू हळू पटू लागले आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात हा पहिलाच प्रयोग असल्याने त्यांचा नवीन प्रयोग पाहण्यासाठी नाशिकचे कृषिअधिक्षक तुकाराम जगताप, उपविभागीय कृषीअधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषिअधिकारी संजय शेवाळे यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.
शेतीतून मिळणारे उत्पादन, त्यासाठी लागणारा खर्च व मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचे चालले होते. जमिनीचा कस हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे त्यांनी प्रवाहापासून वेगळे धोरण स्विकारले. बहुमजली पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे टप्प्याटप्प्याने उत्पादन व उत्पन्न मिळते. एका पिकातून नुकसान झाले तर दुसऱ्या पिकातून भरून निघते. त्यांनी शेतीमध्ये फुलविलेले कारले आंतरपीक बाजारात दाखल झाले असून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. त्यांनी ओसाड माळरानावर सरी पाडून लागवड केली. विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा मारा करत शेणखत, गांडूळखत शेतीला देऊन जीवदान दिले. आदिवासी शेतकर्याने मोठ्या परिश्रमाने पिकविलेले कारले आता नाशिक, मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी जात आहे.
माझे शिक्षण जरी कमी असले तरी जिद्दीने यावर्षांपासून बहुमजली कारले व टमाट्याची आंतरपीक शेती करतो आहे. सुरूवातीला पिकाच्या लागवडीविषयी काहीही माहिती नव्हती मात्र पाण्याचे काटेकोर नियोजन आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेत सुरवात केली. कोणत्याही हंगामात कोणत्याही पिकात पाण्याच्या नियोजनाला सर्वाधिक महत्त्व दिल्यास शेती यशस्वी होऊ शकते. माझ्या यशात कृषीसहाय्यक रणजित आंधळे यांचा मोलाचा वाटा आहे.
- काशिनाथ कोरडे, शेतकरी, वासाळी, ता. इगतपुरी