वाहतूक नियंत्रणातील आयटीचा वापर, विविध उपक्रम प्रशंसनीय - अमिताभ बच्चन

By Admin | Published: January 9, 2017 07:05 PM2017-01-09T19:05:57+5:302017-01-09T19:05:57+5:30

महाराष्ट्र पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महापालिका आणि परिवहन आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 28 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा आज ज्येष्ठ

Use of IT in Traffic Control, various activities are commendable - Amitabh Bachchan | वाहतूक नियंत्रणातील आयटीचा वापर, विविध उपक्रम प्रशंसनीय - अमिताभ बच्चन

वाहतूक नियंत्रणातील आयटीचा वापर, विविध उपक्रम प्रशंसनीय - अमिताभ बच्चन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महापालिका आणि परिवहन आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 28 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा आज ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुंबई शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात येत असलेला आयटी तंत्रज्ञानाचा वापर व यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम प्रशंसनीय आहेत, असे गौरवोद्गार अमिताभ बच्चन यांनी याप्रसंगी काढले.     
एनसीपीए सभागृहात आयोजित या कार्यक्रमास गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, अपर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन, परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार, देवेन भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हायड्रॉलिक क्रेनला झेंडी दाखवून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. 9 ते 15 जानेवारी दरम्यान हा सप्ताह चालणार असून या काळात विविध उपक्रमांद्वारे रस्ते सुरक्षीततेविषयी जनजागृती केली जाणार आहे.
 
अमिताभ यांनी केले MTP अॅप डाऊनलोड...
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सादरीकरण करताना मुंबई वाहतूक पोलीसांच्या MTP (Mumbai Traffic Police) या अॅपविषयी  सहपोलीस आयुक्त भारंबे यांनी माहिती दिली होती. कार्यक्रम सुरु असतानाच आपण आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्याचे बच्चन यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात येत असलेला आयटी तंत्रज्ञानाचा वापर व यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम प्रशंसनीय आहेत. आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा तेथील वाहतुकीची शिस्त पाहून आपण अचंबित होतो. आपल्या देशातही अशीच शिस्त आवश्यक असून जेव्हा परदेशातील लोक इथे येतील तेव्हा इथली वाहतुकीची शिस्त पाहून त्यांनी अचंबित व्हायला हवे. मुंबई वाहतूक पोलीसांमार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम पाहून तो दिवस फार दूर नाही असा विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले. 
 
रस्ते सुरक्षेसाठी स्वतंत्र निधी - अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव
अपर मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव म्हणाले की, रस्ते अपघातातून होणारी मोठी जिवीतहानी लक्षात घेता रस्ते सुरक्षा हा विषय शासनाने प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. यासाठी स्वतंत्र रस्ते सुरक्षा निधी उभा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून विधीमंडळाच्या मागच्या अधिवेशनात यासंदर्भातील निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
पोलीस आयुक्त श्री. पडसलगीकर म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात अपघातांमध्ये दरवर्षी पाचशे ते सहाशे जणांचा मृत्यू होतो. देशभरात दरवर्षी लाखो लोक अपघातांमध्ये बळी पडतात. देशाच्या मनुष्यबळाची होणारी ही खूप मोठी हानी आहे. हे रोखण्यासाठी वाहतुकीतील शिस्त आवश्यक असून लोकांनी जाणीवपूर्वक यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
अपर पोलीस महासंचालक श्री. पद्मनाभन म्हणाले की, वाहतुकीमधील बेशीस्त रोखणे ही काळाची गरज झाली आहे. याशिवाय चांगल्या वाहतूकीसाठी दर्जेदार पायाभूत सुविधांचीही आवश्यकता आहे. शिस्तबद्ध वाहतुकीविषयी संवेदनशील होऊन आपण अपघातांमधून होणारी मोठी प्राणहानी टाळू शकतो, असे ते म्हणाले.    
 
वाहतूक नियंत्रणासाठी हेल्पलाईन
वाहतुकीवर नियंत्रणासाठी मुंबई वाहतूक पोलीसांमार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी सहपोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. भारंबे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. मुंबईत वाहतूक नियंत्रणासाठी MTP (Mumbai Traffic Police) हे ॲअॅप सुरु करण्यात आले असून त्यावर वाहतूक शाखेशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय ८४५४९९९९९९ या क्रमांकावर हेल्पलाईनही सुरु असून या सेवांचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भारंबे यांनी यावेळी केले. 

Web Title: Use of IT in Traffic Control, various activities are commendable - Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.