भिकेसाठी लेकीच्या प्रेताचा वापर
By Admin | Published: April 20, 2016 06:02 AM2016-04-20T06:02:50+5:302016-04-20T06:02:50+5:30
पैसे कमावण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. एका राजस्थानी दाम्पत्याने भीक मागून पैसे मिळविण्यासाठी चक्क तीन वर्षीय चिमुकल्या मुलीच्या प्रेताचाच वापर केला.
विनोद काकडे , औरंगाबाद
पैसे कमावण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. एका राजस्थानी दाम्पत्याने भीक मागून पैसे मिळविण्यासाठी चक्क तीन वर्षीय चिमुकल्या मुलीच्या प्रेताचाच वापर केला. पदराखाली चिमुकलीचे प्रेत दडवून ती आजारी असल्याचे भासवत ‘माय-बाप दया करा, पैसे द्या, ही आजारी आहे, दवाखान्यात न्यायचे आहे, पैसे द्या’ अशी याचना करीत हे दाम्पत्य मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सिग्नलवर भीक मागत होते. पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाच्या सतर्कतेमुळे हे धक्कादायक अन् मानवजातीला काळिमा फासणारे कृत्य उजेडात आले.
हे कृत्य करणारी सुरशी राजूलाल बागरी (३५), तिचा पती राजूलाल बागरी (३८), दीर राकेश कजोडीलाल बागरी (३४), त्याची पत्नी रुक्मिणी (३०) या चौघांनाही बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील चिमुकलीचे प्रेत घाटीच्या शवागृहात ठेवण्यात आले आहे. बागरी कुटुंब हे मूळ राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील मलियेडा सांगोटा येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, दामिनी पथकातील फौजदार अरुणा घुले, तसेच त्यांच्या सहकारी स्वाती बनसोड, शहाणे, पठाण व जीपचालक कीर्तिशाही मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास दिल्लीगेट परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काही चिमुकली मुले रस्त्यावर रडताना या पथकाच्या नजरेस पडली. बाजूला राकेश व रुक्मिणी बागरी बसलेले होते. पोलिसांनी गाडी थांबविली आणि ‘मुले का रडतात?’ अशी विचारणा केली. त्यावर या मुलांचे आई-वडील सिग्नलवर भीक मागत आहेत, असे पोलिसांना समजले. हे कोठून आले, हे जाणून घेण्यासाठी पथकाने सिग्नलवर भीक मागत असलेल्या सुरशी आणि तिचा पती राजूलाल या दोघांना बोलावून घेतले.
अन् पोलिसांना धक्काच बसला...
राजूलाल आणि सुरशी हे दोघे पोलिसांजवळ आले. तेव्हा सुरशी ही पदराआड काही तरी दडवत असल्याचे लक्षात आले. पदराआडची मुलगी आजारी असल्याचे तिने पोलिसांना भासवले. दाखव म्हटल्यानंतर ती कावरीबावरी झाली. पोलिसांच्या दट्ट्यापुढे तिने पदर बाजूला केला. त्याच क्षणी महिला पोलिसांच्या पथकाला धक्काच बसला. तीन वर्षीय या चिमुकलीच्या हृदयाची धडधड बंद होती. सर्व शरीर काळे-निळे व तोंड उघडे पडलेले होते. उघड्या डोळ्यांची हालचाल बंद होती. ती कित्येक तास आधीच मरण पावलेली होती, लगेच पोलिसांनी सुरशी, तिचा पती राजूलाल, दीर राकेश, रुक्मिणी व त्यांच्या मुलांना बेगमपुरा ठाण्यात नेले.
‘त्या’ चिमुकलीचे कुपोषणही?
पोटाची खळगी भरण्यासाठी सुरशी व तिचा पती राजूलाल हे ज्या तीन वर्षीय आमरी या चिमुकलीचा सहारा घेत होते, त्या चिमुकलीच्या मृत्यूचे कारण कुपोषणही असू शकते, असे प्रथमदर्शनी घाटीतील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत दिसून आले. बुधवारी शवविच्छेदनानंतर चिमुकलीच्या मृत्यूचे नेमके कारण आणि तो कधी झाला, हे स्पष्ट होईल.
म्हणे मला कल्पनाच नाही...
सुरशीच्या पदराखाली असलेली मुलगी पाहून, ही मरण पावली तुला माहीत नाही का, असे पोलिसांनी तिला विचारले. त्यावर तिने मला ती मरण पावल्याची कल्पनाच नाही. ती आजारी होती, असे उत्तर दिले.
यापूर्वीही केली होती कारवाई
विशेष म्हणजे या कुटुंबाला भीक मागताना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुलांना महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले. तेव्हा बागरी कुटुंबाने आमची मुले आम्हाला द्या, या मागणीसाठी समितीच्या कार्यालयातच ठिय्या मांडला होता. ती मुले परत घेतल्यानंतरच हे कुटुंब तेथून हलले होते, असे पोलिसांच्या चौकशीसमोर आले आहे.
चौकट
भिकेसाठी अपंग असल्याचा बनाव
पोलिसांनी जेव्हा सुरशीसोबत तिचा दीर राकेशला पकडले तेव्हा तो अपंग असल्याचे आणि कुबड्यांच्या साहाय्याने चालत असल्याचे लक्षात आले. अपंग असल्याचे कारण सांगत तो लोकांकडून भीक मागत होता; परंतु त्याच्या अपंग असल्याबाबत संशय आला. त्यामुळे त्याच्या कुबड्या पोलिसांनी काढल्या आणि ‘खाक्या’ दाखविताच तो विनाकुबड्या तडातडा चालू लागला. भीक मागण्यासाठी मी अपंग असल्याचा बनाव करीत होतो, अशी नंतर त्याने स्पष्ट कबुली दिली.
डीएनए टेस्ट करणार
बागरी कुटुंबाकडे सापडलेल्या मयत चिमुकलीबरोबरच सोबतच्या चार मुलांना बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही मुले खरोखरच या कुटुंबाची आहेत का, की भीक मागण्यासाठी ती पळवून आणली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी आता या मुलांची डीएनए टेस्ट करण्यात येणार असल्याचे बेगमपुरा ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. हे कुटुंब भीक मागून उपजीविका भागविते. भीक मागण्यासाठी ते कुटुंब सतत औरंगाबादेत येते, असे सावंत म्हणाले.