सर्वच क्षेत्रांत मराठीचा वापर वाढवायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:58 PM2020-02-25T22:58:08+5:302020-02-25T22:58:32+5:30

भौतिक, आर्थिक, व्यावसायिक प्रगतीसाठीही मराठीचा वापर वाढवायला हवा. तरच क्षेत्र कोणतेही असो, त्यात यशाची मोठी झेप घेणे सहज शक्य आहे.

The use of Marathi in all areas should be increased | सर्वच क्षेत्रांत मराठीचा वापर वाढवायला हवा

सर्वच क्षेत्रांत मराठीचा वापर वाढवायला हवा

Next

- अनिल गोरे (मराठीकाका)

मराठीचा अभिमान, अस्मिता जपण्यासाठी तसेच भाषेचा हा अनमोल ठेवा परिपूर्णतेने पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्यासाठी मराठीत बोलणे, चालणे, व्यवहार करणे गरजेचे आहे. सोबतच भौतिक, आर्थिक, व्यावसायिक प्रगतीसाठीही मराठीचा वापर वाढवायला हवा. तरच क्षेत्र कोणतेही असो, त्यात यशाची मोठी झेप घेणे सहज शक्य आहे.

मराठी ही एक लोकभाषा व महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ समान दर्जाच्या राजभाषांपैकी एक आहे. १०० वर्षांपूर्वी भाषा किती लोक बोलतात, या निकषावर मराठीचे स्थान जगात दुसऱ्या क्रमांकावर होते. आता ते घसरून १०व्या क्रमांकावर आले आहे. मराठीची काही वैशिष्ट्ये आहेत.
(१) मराठी शब्द कमी अक्षरी म्हणजे दोन ते पाच अक्षरी असे लहान असतात.
(२) मराठी वाक्यात पूरक शब्द पुन्हा-पुन्हा व सुट्टे लिहावे लागत नाहीत, म्हणून मराठी वाक्यांत कमी शब्द लागतात.
(३) मराठी वाक्यरचना लवचीक असते. बरेचसे शब्द मागेपुढे झाले, तरी मराठी वाक्याचा अर्थ बदलत नाही आणि वाक्य व्याकरण नियमानुसार योग्य राहते. या गुणामुळे शब्द सुचले की, त्यांचा विशिष्टच क्रम लावण्याची सक्ती नसल्याने वाक्य सहज बनते.
(४) मराठी शब्दच अनेकदा स्वतंत्र विशेषणाशिवाय लिंग, काळ, वचन, श्रेष्ठ-कनिष्ठता स्पष्ट करतात.
(५) २ ते ३०चे पाढे मराठीतून म्हणताना केवळ ८७० शब्द लागतात, तर इंग्लिशमधून म्हणताना २,२१७ शब्द लागतात. २ ते ३० पाढे सहज पाठ होण्याचे भाग्य मराठी पाढे पाठ करणाऱ्यांना लाभते.
(६) गणितातील आकडेमोड वेगाने करायला पावकी, निमकी, पाउणकी, सवायकी, दीडकी, अडीचकी, औटकी हे प्रकार फक्त मराठीतच आहेत.
(७) मराठीत ५० हून अधिक गद्य, पद्य प्रकार आहेत, तर २५ हून अधिक सादरीकरणाच्या कला आहेत.
(८) सर्वसामान्यांच्या सहभागाने सण-समारंभाप्रमाणे भव्य स्वरूपात जसे मराठी साहित्य संमेलन दरवर्षी पार पडते, तसे भव्य आणि सर्वसमावेशक साहित्य संमेलन जगातील अन्य कोणत्याही भाषेचे होत नाही.
(९) मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचे इंग्लिश तर इंग्लिश माध्यमातून शिकलेल्यांपेक्षा चांगले असते. मराठीच्या भक्कम पायामुळे इंग्लिशचीही इमारत उभी राहिल्याने, मराठी माध्यम शाळेत शिकलेली मुले, मुली कायम उच्चशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश, उच्चशिक्षण क्षेत्रातील कठीण प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, खासगी उद्योगसमूहातील भरती परीक्षा, मुलाखती, बढती यात पुढे असतात आणि व्यवसाय केल्यास अधिक यशस्वी असतात!
या सर्व बाबींचा विचार करता, दैनंदिन संभाषण, शालेय शिक्षण, उच्चशिक्षण, व्यापार, व्यवसाय, प्रशासन, कला, सादरीकरण, सल्ला सेवा, उत्पादन, प्रसिद्धी, जाहिरात या व अशा सर्व क्षेत्रांत मराठीचा वापर करणे अतिशय उपयुक्त व लाभदायक ठरेल. मराठीच्या विविध चांगल्या गुणांमुळेच १०वी, १२वी, पदवी, संशोधन, नोकरी, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात मागील शंभर वर्षे ते आजपर्यंत मोठे यश मिळण्याचे भाग्य पहिली ते १० वीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेल्यांना मिळताना दिसते.
मराठीचा वापर केवळ अस्मिता, अभिमान किंवा मातृभाषा या भावनिक कारणापुरता मर्यादित न करता, भौतिक, आर्थिक, व्यावसायिक यशासाठीही वाढवायला हवा. मराठी ही ज्ञानभाषा असल्याने शिक्षण, प्रशासन, कलाकौशल्य, व्यापार, उद्योग अशा सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा वापर केल्यास, महाराष्ट्र आर्थिक, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकेल. याबाबत थोडक्यात सांगायचे झाले, तर ‘मराठीची नांदी, मंदीतही चांदी’ असे म्हणता येईल.
 

Web Title: The use of Marathi in all areas should be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी