कोरड्या चर्चांपेक्षा मराठी भाषेचा वापर करा
By admin | Published: February 11, 2016 02:17 AM2016-02-11T02:17:53+5:302016-02-11T02:17:53+5:30
‘मराठी भाषा कशी जगवायची याच्या कोरड्या चर्चा करत बसण्यापेक्षा व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. लिहिणे ही गोष्ट छंद किंवा निव्वळ आवड न राहता जेव्हा जगणे
पुणे : ‘मराठी भाषा कशी जगवायची याच्या कोरड्या चर्चा करत बसण्यापेक्षा व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. लिहिणे ही गोष्ट छंद किंवा निव्वळ आवड न राहता जेव्हा जगणे बनते त्याच वेळी सकस साहित्यनिर्मिती होऊन भाषा वाढीस लागते,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.
साहित्य संस्कृती मंच संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आकाशवाणीचे सहायक वृत्तसंचालक नितीन केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘अलीकडच्या काळात प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांच्यातील भेद पुसट व्हायला लागले आहेत. प्रसारमाध्यमेही बोलीभाषेचा वाढता वापर करीत आहेत. त्यामुळे माध्यम साक्षरता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन केळकर यांनी केले. राजा परदेशी स्मृतिपुरस्कार रत्नमाला खिंवसरा यांना देण्यात आला. कथालेखन, कवितालेखन, उखाणे, कथावाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
त्यापूर्वी सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेच्या कार्यवाह स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष अरुणा महाळंक यांनी प्रास्ताविक केले. अनिल स्वकुळ यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)